
<< डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
[email protected]
मराठीतील आघाडीच्या चरित्रलेखिका वीणा गवाणकर. कधी विस्मृतीच्या अंधारात गेलेल्या, कधी जगानं उपेक्षा केलेल्या थोर माणसांच्या कार्याला त्यांनी अक्षर-प्रकाश दाखवला आहे.
पुण्याजवळच्या लोणी काळभोर इथला जन्म, चौल, मनमाड, इंदापूर, खेद अशा विविध गावांतून शिक्षण, फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी आणि पुणे विद्यापीठाची ग्रंथपाल पदवी असा शैक्षणिक प्रवास असलेल्या वीणा गवाणकर या आज मराठीतील आघाडीच्या चरित्रलेखिका आहेत. 1981 मध्ये ‘एक होता कार्व्हर’ पुस्तकरूपानं प्रकाशित झालं, पाहता पाहता ‘कार्व्हर’नं वाचकांची मनं काबीज केली आणि वीणा गवाणकर हे नाव एकदम प्रकाशझोतात आलं…आणि अजूनही तो झोत तसाच आहे. त्यावेळी ‘कार्व्हर’ वाचून भारावून गेलेली पिढी आता चाळिशीत आली आहे, तरी त्याचं गारुड ओसरलेलं नाही. ‘एक होता कार्व्हर’ची नुकतीच पन्नासावी आवृत्ती प्रकाशित झाली आणि मुलांसाठीही ‘किमयागार कार्व्हर’ ही सचित्र आवृत्ती आली आहे. अजूनही लेखिकेला कुठून कुठून त्यावर प्रतिसाद येत असतो. मुलांची पत्रं, मेल्स आणि त्या जातील तिथे संवाद. खुद्द वीणाताईही म्हणतात की, ‘कार्व्हर’ हा पासवर्ड ठरला.
‘कार्व्हर’नंतर त्यांनी सातत्यानं लोकांच्या कल्याणासाठी झटलेल्या, विविध क्षेत्रांतल्या, विविध देशांतल्या वैशिष्ट्यपूर्ण काम केलेल्या 13 व्यक्तिमत्त्वांचा परिचय स्वतंत्र पुस्तकं लिहून करून दिला आहे. त्यात भौतिक शास्त्रज्ञ स्त्री- लीझ माईटनर आहे, भारतात येऊन हॉस्पिटल उभं करून वैद्यकीय सेवा देणारी डॉ. आयडा स्कॅडर आहे , ‘डार्क लेडी ऑफ डीएनए’ म्हणून गौरवली गेलेली रोझलिन्ड प्रान्कलीन आहे, गोल्डा मायर ही इस्रायलची माजी पंतप्रधान आहे, डॉ.विलासराव साळुंखे आहेत, डॉ. खानखोजे आहेत, सर्पतज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स आहे, पक्षीतज्ञ डॉ. सलीम आली आहेत. रॉबी डिसिल्व्हासारखे कलावंत आहेत आणि थोरोसारखा तत्त्वचिंतकही आहे. मेरी दि हेन्झेल यांच्या ‘इंटीमेट डेथ’ या पुस्तकाचा त्यांनी केलेला ‘आयुष्याचा सांगाती’ हा अनुवाद असाच अत्यंत मौलिक आहे. कधी विस्मृतीच्या अंधारात गेलेल्या, कधी जगानं उपेक्षा केलेल्या थोर माणसांच्या कार्याला त्यांनी अक्षर-प्रकाश दाखवला आहे. केवळ चरित्रं लिहायची आणि त्यांची संख्या वाढवायची म्हणून नव्हे, तर त्यांना एखादा विषय, व्यक्ती, तिचं काम मुळातून स्वतःला समजून घ्यायचं असतं. त्यासाठी त्या भरपूर वाचन करतात, माहिती, टिपणं, नोंदी असा चांगला तीन-चार वर्षांचा प्रवास असतो. हा काळ जणू वीणाताई त्या त्या माणसाच्या सहवासात असतात. त्यामागची त्यांची स्वतची प्रेरणा मात्र कुतूहल आणि मग स्वतला जे भिडलं ते इतरांना सांगणं ही असते. विषय नीट मुरवून घेऊन मगच त्या लिहायला घेतात.
त्यामुळे त्यांच्या लेखनात प्रवाहीपणा असतो. भाषा साधी, नितळ असते. आशयाचे प्रतिबिंब धरणारी. महत्त्वाचं म्हणजे त्या या सर्व थोर माणसांच्या मनातील माणुसकी आणि मानव कल्याणाचा विचार त्या अधोरेखित करतात. त्यांचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि निराशेवर मात करण्याची विजिगिषु वृत्ती यांकडे त्यांचा रोख असतो. कारण ही खरी जग बदलणारी माणसं! ‘भगीरथाचे वारस डॉ.विलासराव साळुंखे’, नाही चिरा नाही पणती – डॉ. खानखोजे’, ‘अवघा देहचि वृक्ष जाहला – रिचर्ड बेकर’, ‘गोल्डा- एक अशांत वादळ’ अशी त्यांच्या चरित्रांची शीर्षके पहा… किती नेमकी आहेत. त्या त्या व्यक्तीच्या कार्याच्या मर्माला थेट भिडणारी! काय सांगायचे, कसे सांगायचे याविषयी स्पष्टता असल्यामुळे वीणाताई इंग्रजी- मराठीमधला, विज्ञान आणि रंजकता यातला, वास्तव आणि गोष्ट यातला सेतू झाल्या आहेत. त्यांच्याकडे इतिहासकाराची नजर आहे, अभ्यासकाची वस्तुनिष्ठा आहे आणि माणुसकीच्या झऱ्याची ओल आहे. स्वत विज्ञान शाखेच्या पदवीधर नसूनही त्यांना विज्ञानाविषयी कमालीची आस्था, उत्सुकता आणि आदर आहे. लहानपणापासून त्यांना चांदोबा वाचण्यापेक्षा चरित्रं वाचायला आवडत असत. पुस्तकांच्या खिडकीतून जगाचं कुतूहल त्या जाणून घेत आणि आता त्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला जगाची ओळख करून देतायत! त्यातूनच 13 चरित्रे, एक अनुवाद आणि काही स्फुट लेखन आकाराला आलं आहे. ‘शाश्वती’ हे भ्रूणहत्याविरोधी नभोनाट्य त्यांनी लिहिलं आहे. आजवर 16 पेक्षा अधिक विविध पुरस्कार त्यांना लाभले आहेत. काही विभागीय संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषवली आहेत. गेली पाच दशकं अव्याहत चालू असलेला हा ज्ञानयज्ञ मराठी साहित्यात आणि वाचकांच्या ज्ञान-माहितीत भर घालत आहे.
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)



























































