Ratnagiri News – दुष्काळाच्या तोंडावर कडवई धरणातून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती; ग्रामस्थांमध्ये चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील लघुपाटबंधारे विभागाच्या धरणाच्या मुख्य भिंतीतून आणि सांडव्याच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या चार वर्षांपासून धरणाला लागलेली गळती अद्याप कायम असून, यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळसदृश परिस्थितीत पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

जलसंपदा विभागाच्या दक्षिण रत्नागिरी लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील कडवई धरण या परिसरासाठी जलसंजीवनी ठरले आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र ५.५० चौ. कि.मी., लांबी २६५ मीटर, उंची २५.५० मीटर, तर बुडीत क्षेत्र २४.२९ हेक्टर आहे. धरणातील पाणीसाठ्यामुळे गेल्या सुमारे ५० वर्षांत परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली असून, गावातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे.

मात्र, गेल्या चार वर्षांपासून धरणाच्या मुख्य भिंतीला तसेच सांडव्याच्या तोंडाशी गळती लागली आहे. ही गळती रोखण्यासाठी लाखो रुपयांची कामे व निविदा प्रक्रिया होऊनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने गळतीचा परिणाम फारसा जाणवला नाही. परंतु यंदा पाऊस कमी पडल्याने धरणातून वाहून जाणारे पाणी आता चिंतेचा विषय बनले आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी धरणाच्या गळतीचा प्रश्न उपस्थित करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. महिनाभरापूर्वी दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय समितीनेही धरणाची पाहणी केल्याचे समजते. दरम्यान, सांडव्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने तेथून होणारा पाण्याचा विसर्ग नेमका किती आहे, याचा अंदाज घेणेही कठीण होत आहे.

याबाबत पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता चंद्रकांत धामापूरकर यांच्याशी संपर्क साधला असता, दोन वर्षांपूर्वी गळती रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हे प्रयत्न अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाले नाहीत, अशी कबुलीही त्यांनी दिली. धरणातून पाण्याचा विसर्ग होत असला तरी गावात पाणीटंचाई निर्माण होईल, असे सध्या वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, काही प्रमाणात पाण्याच्या वापरावर निर्बंध घालावे लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच सांडव्यावर वाढलेली झाडी लवकरच हटविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीकडून संबंधित कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांना लेखी पत्र देण्यात आले असल्याची माहिती ग्रामाधिकारी राहुलकुमार चौधरी यांनी दिली.धरणाच्या मुख्य भिंतीतून होणारी गळती वेळीच रोखून पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. अन्यथा, पावसाअभावी पाणीसाठा कमी होत असताना धरणातील पाणी असेच वाहून गेल्यास आगामी काळात परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.