दोन महिन्यांत दोन बचाव मोहिमा! ‘ट्रिना’ ठरली बेपत्ता व्यक्तींसाठी देवदूत; 70 वर्षीय हायकरचा शोध घेण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील हवाई व्होल्कॅनोस नॅशनल पार्कमध्ये बेपत्ता झालेल्या 70 वर्षीय हायकरचा शोध घेण्यात ‘ट्रिना’ या तीन वर्षांच्या पोलीस लॅब्राडोर श्वानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तब्बल 24 तासांहून अधिक काळ बेपत्ता असलेल्या डेव्हिड अराई यांना ट्रिनाने त्यांच्या भाड्याच्या वाहनापासून सुमारे दोन मैल अंतरावर शोधून काढले. विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांत ट्रिनाने यशस्वी केलेली ही दुसरी बचाव मोहीम आहे. तिच्या आगमनासाठी आणि प्रशिक्षणासाठी 25 हजार डॉलरची देणगी देण्यात आली होती.

स्वीडनमधून हवाई येथे आणलेल्या ट्रिनाने यापूर्वी एका महिन्यापूर्वी वायकोलोआ परिसरात बेपत्ता झालेल्या एका किशोरवयीन मुलाचा शोध घेण्यातही मदत केली होती. आता 70 वर्षीय अराई यांचे प्राण वाचवण्यात तिने मोलाचे योगदान दिल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. डेव्हिड अराई हे सोमवारी हवाई व्होल्कॅनोस नॅशनल पार्कमध्ये हायकिंगसाठी गेले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आणि संबंधित यंत्रणांनी चिंता व्यक्त केली. अराई यांच्याबाबत दुपारी 12 वाजून 16 मिनिटांनी पुना परिसरातील गस्त पथकाला माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.

सात तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या शोधमोहिमेला अखेर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास यश आले. पोलीस अधिकारी ख्रिस्तोफर रॉस यांच्यासोबत असलेल्या ट्रिनाने अराई यांचा माग काढला. ते मुख्य पायवाटेपासून काही अंतरावर झुडपांमध्ये पाठीवर पडलेले आढळले. अराई यांना शोधून काढल्यानंतर ट्रिना त्यांच्या जवळ गेली आणि त्यांचा हात चाटू लागली. या प्रसंगाचे वर्णन करताना पोलीस अधिकारी रॉस यांनी सांगितले की, अराई हे मुख्य मार्गापासून थोडे दूर झुडपांमध्ये पडलेले होते. सुरुवातीला त्यांना अराई यांच्या डोक्याचा वरचा भाग दिसला.

या मोहिमेत ट्रिनाने बजावलेली भूमिका रॉस यांच्यासाठीही भावनिक होती. तिच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, ही श्वान आम्हाला मिळणे म्हणजे एक वरदानच आहे. झोपण्यापूर्वी त्यांच्या मनात आलेला शेवटचा विचार म्हणजे आपल्याला खरोखरच एक देवदूत मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोण आहे ट्रिना?

ट्रिना ही तीन वर्षांची लॅब्राडोर रिट्रीव्हर असून, विशिष्ट व्यक्तीचा वास ओळखून तिचा माग काढण्यासाठी तिला प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशा प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे अधिक सोपे होते. हवाई पोलीस विभागासोबत काम करताना ट्रिना बेपत्ता मुले आणि धोक्यात असलेल्या प्रौढ व्यक्तींचा शोध घेण्याच्या मोहिमांमध्ये सहभागी होते. ट्रिनाच्या आगमनासाठी आणि प्रशिक्षणासाठी 25 हजार डॉलरची देणगी देण्यात आली होती. तिच्या कामगिरीमुळे या गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.