
>> अशोक शिंदे
धाराशिव जिल्हयात यंदा न भूतो न भविष्यति असा भयंकर दुष्काळ पडला आहे. शेतकरी, जनावरांसह पशू पक्ष्यांनाही दुष्काळाचे चटके बसत आहेत. कळंब तालुक्यातील रेशीम शेतीलाही दुष्काळाचा जबरदस्त फटका बसला आहे. पाण्याअभावी तुतीची झाडे वाळून गेली आहेत. तुतीचा पालाच उपलब्ध नसल्यामुळे रेशमाच्या अळ्यांची उपासमार होत आहे. अत्यंत कष्टातून उभा राहिलेला तालुक्यातील रेशीम उद्योग दुष्काळाच्या मगरमिठीत सापडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून कळंब तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरली होती. कमी क्षेत्रात अधिक उत्पन्नाची आशा आणि आर्थिक स्थैर्याची नवी वाट म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जात होते. या शेतीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक भरारीही घेतली होती. मात्र, यंदाच्या भीषण
दुष्काळाने या शेतीवरही घाला घातला आहे. पाण्याअभावी तुतीची झाडे वाळून गेली असून, रेशमाच्या अळ्यांचे संगोपन करणे अशक्य झाले आहे. पारंपरिक शेतीतून उत्पन्न मिळाले नाही, तर रेशीम शेतीतून आर्थिक आधार मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची स्वप्नेही आता कोमेजू लागली आहेत.
मनरेगातून उभी राहिली रेशीम शेती !
निसर्गातील बदल लक्षात घेऊन शेतीचे तंत्र बदलण्याची गरज ओळखत कळंब तालुक्यातील सुमारे एक हजार कुटुंबांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) तुती लागवड करून रेशीम शेती सुरू केली होती. या शेतीमुळे अनेक कुटुंबांच्या अर्थकारणात सकारात्मक बदल झाला. उत्पन्नाचे नवे साधन मिळाल्याने त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्याचे दिवस आले होते. मात्र, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने रेशीम शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
माझी तीन एकरात रेशीम शेती आहे. गेल्या वर्षी चार लाखांच्या आसपास उत्पन्न मिळाले होते. या शेतीवरच कुटुंबातील आठ जणांचा उदरनिर्वाह होतो. यंदा पावसाअभावी रेशीम उद्योग संकटात सापडला आहे. शासनाने नुकसानीची दखल घेऊन तातडीने आर्थिक मदत करावी.
– शिवलिंग कुंभार, देवधानोरा
रेशीम शेतीतून चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती; परंतु दुष्काळामुळे पुन्हा आर्थिक संकट ओढावले आहे. शासनाने रेशीम शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच तुतीच्या बागा वाचविण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी.
– व्यंकट शेवाळे, देवधानोरा




























































