IND Vs NZ – नमन धीरने डाव फिरवला; हिंदुस्थानची सर्वोत्तम कामगिरी, न्यूझीलंड दौऱ्याची ऐतिहासिक विजयी सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या यंग ब्रिगेडने आपल्या न्यूझीलंड दौऱ्याची धडाकेबाज सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांमध्ये टीम इंडियाला 226 धावांच तगड आव्हान दिलं होतं. यापूर्वी संघाने इतक्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग केला नव्हता. मात्र, संजू सॅमसन, नमन धीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी आक्रमक पवित्रा धारण धरत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना खरपूस समाचार घेतला आणि चार विकेटने सामना खिशात घातला.

क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 4 बाद 225 धावांचा डोंगर उभा केला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर अभिषेक शर्मा (29) आणि संजू सॅमसन यांनी संघाला अत्यंत आक्रमक आणि धडाकेबाज सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या काही षटकांत 93 धावांची भागीदारी करत विजयाची भक्कम पायाभरणी केली. मात्र, तिलक वर्मा (6) आणि इशान किशन (1) यांनी नाराज केलं. दोघांच्या विकेट झटपट पडल्याने संघाची अवस्था 122 धावांवर 4 विकेट अशी झाली होती. त्यामुळे सामना हातातून निसटतो का, अशी शंका चाहत्यांच्या मनात निर्माण झाली होती.

सलामीला आलेल्या संजू सॅमसनने 33 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 67 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर मधल्या फळीत कर्णधाराने स्वत: मोर्चा सांभाळत 28 चेंडूंमध्ये संयमी 42 धावा केल्या. 210 या धावसंख्येवर 6 फलंदाज तंबुत परतले होते. संघ अडचणीत होता, मात्र नवख्या नमन धीरने संघाला धीर देत 15 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 42 धावांची नाबाद वादळी खेळी केली. नमन धीरच्या धमाक्यामुळे टीम इंडियाने 2 चेंडू राखून चार विकेटने सामना जिंकला आणि पाच सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात हिंदुस्थानने पहिल्यांदाच 210 किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे, ज्यामुळे हा विजय हिंदुस्थानसाठी अत्यंत खास ठरला आहे.