
हिंदुस्थानी खेळाडूंनी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत बुधवारी पाच सुवर्ण, दहा रौप्य आणि तेरा कांस्य अशी एकूण 28 पदकांची लयलूट करीत पदकतक्त्यात 60 पदकांचा आकडा पार करीत पुन्हा चौथ्या स्थानी झेप घेतली. हिंदुस्थानच्या खात्यात आतापर्यंत 14 सुवर्ण, 22 रौप्य व 26 कांस्य अशी एकूण 62 पदके जमा झाली आहेत.
प्रवीणची विक्रमी झेप; सुवर्णावर मोहोर
पुरुषांच्या उंच उडी टी-64 प्रकारात प्रवीण कुमारने 2.05 मीटरची झेप घेत सुवर्णपदक जिंकले. यासह त्याने याच स्पर्धेतील 2.02 मीटरचा जुना विक्रम मोडीत काढला. बंटीने 1.92 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदकावर नाव कोरले.
सचिन खिलारीचा सुवर्ण ठसा कायम
गोळाफेकीच्या एफ-46 प्रकारात सचिन खिलारीने आपले सुवर्णपदक कायम राखले. मोहम्मद यासरने रौप्य, तर प्रवीणने कांस्यपदक जिंकले. या प्रकारातील तिन्ही पदके हिंदुस्थानी खेळाडूंनी पटकावत प्रतिस्पर्ध्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
धावपटूंचीही पदकांची बरसात
महिलांच्या 100 मीटर टी-12 शर्यतीत सिमरन शर्माने सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या 100 मीटर टी-45 प्रकारात दिलीप गावितने सुवर्ण, तर मोहम्मद बासिलने रौप्यपदक मिळवले. पुरुषांच्या 100 मीटर टी-64 शर्यतीत प्रणव देसाईने कांस्यपदक पटकावले. महिलांच्या 100 मीटर टी-35 शर्यतीत प्रीती पालने रौप्य, तर पुरुषांच्या याच प्रकारात अनुभव चौधरीने कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या 100 मीटर टी-37 प्रकारात राकेश भट्टने कांस्यपदक मिळवले.
आयुषची दुसरी पदककमाई; भाग्यश्रीचे रौप्य
पुरुषांच्या गोळाफेकीत एफ-53 प्रकारात आयुष वर्माने 8.16 मीटरची फेक करीत सुवर्णपदक जिंकले. हे त्याचे स्पर्धेतील दुसरे पदक आहे. यापूर्वी त्याने कांस्यपदकही पटकावले होते. महिलांच्या एफ-34 गोळाफेकीत भाग्यश्री जाधवने रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या एफ-12/एफ-13 भालाफेक प्रकारात मनजीतने रौप्य, तर एफ-40 गोळाफेकीत रवी रोंगालीने कांस्यपदक मिळवले.
तिरंदाजी, पॉवरलिफ्टिंगमध्येही हिंदुस्थानची छाप
पॅरा कंपाऊंड महिला दुहेरीत शीतल देवी आणि पायल नाग यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात चिनी जोडीने त्यांचा 150-141 असा पराभव केला. महिला पॉवरलिफ्टिंगच्या 67 किलो वजनी गटात कस्तुरी राजमणीने रौप्यपदक जिंकले. बॅडमिंटनच्या महिला दुहेरीत प्रकारात अल्फिया आणि पल्लवी के. यांनी कांस्यपदक पटकावले.
गोळाफेकीत मराठमोळय़ा खेळाडूंचा डंका
मराठमोळे पॅरा खेळाडू सचिन खिलारी व भाग्यश्री जाधवने नागोया-जपानमधील आशियाई पॅरा स्पर्धेतील गोळाफेकीत अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
अपेक्षेप्रमाणे सांगलीचा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सचिन खिलारीने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णयशाचा आपला डंका वाजविला आहे. गोळाफेक एफ 46 प्रकारात सचिनसह रूपेरी व कांस्यपदकही हिंदुस्थानी खेळाडूंनी जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आपल्या पहिल्याच प्रयत्नात सचिनने 15.79 मीटर विक्रमी फेकी करून आपले सुवर्णपदक निश्चित केले.
अमेरिकेत सराव केल्यामुळेच माझी कामगिरी सुधारली त्यामुळेच मी विक्रम करू शकलो असे सांगून सचिन म्हणाला की, ‘जागतिक स्पर्धा, ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचे माझे ध्येय आहे. पुण्यातही बालेवाडीत प्रशिक्षक पॉल विल्सनने माझ्याकडून सराव घेतला.’
महिलांच्या गोळाफेक एफ 34 प्रकारात नांदेडच्या भाग्यश्री जाधवनेही सलग दुसऱ्यांदा रौप्यपदक जिंकले. पदक जिंकल्यानंतर भाग्यश्री म्हणाले की, ‘हे पदक मला ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी नवी ऊर्जा देणारे आहे. आई पुष्पा जाधव यांच्या साक्षीने पदक जिंकण्याचा आनंद मोठा आहे.’





























































