
हिमालय त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि शांत दऱ्याखोऱ्यांसाठी ओळखला जातो. मात्र, या सुंदर पर्वतांच्या अगदी खाली एक मोठी भूवैज्ञानिक हालचाल होत आहे. अलिकडच्या वैज्ञानिक संशोधनामुळे हिंदुस्थानसाठी मोठी चिंता निर्माण झाली आहे. उत्तराखंडच्या खाली असलेली 115 किलोमीटर रुंदीची एक टेक्टॉनिक प्लेट पूर्णपणे दबली आहे. यामुळे जमिनीखाली प्रचंड प्रमाणात ऊर्जा साठत आहे. ही साठवलेली ऊर्जा भविष्यात 8.1 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप घडवून आणू शकते, अशी अभ्यासकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
आयआयटी मुंबई, अमेरिकेतील न्यू मेक्सिको विद्यापीठ आणि तामिळनाडू केंद्रीय विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या एका नव्या संयुक्त वैज्ञानिक अभ्यासानुसार, उत्तराखंडच्या खाली असलेली सुमारे 115 किलोमीटर रुंदीची एक टेक्टॉनिक प्लेट पूर्णपणे बंद झाली आहे. ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (जीएनएसएस) आणि जपानच्या एएलओएस-2 रडार उपग्रहाकडील अचूक डेटाचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी हा खळबजनक शोध लावला आहे. हिंदुस्थानी प्लेट आणि तिबेटी प्लेट दरवर्षी 18 मिलिमीटरच्या वेगाने एकमेकांवर दाब टाकत आहेत. मात्र, खडक एकमेकांना घट्ट चिकटून राहिल्यामुळे ते पुढे सरकू शकत नाहीत. ही स्थिती एखाद्या ताणलेल्या रबरबँडसारखी बनली असून, जमिनीखाली प्रचंड ताण आणि ऊर्जा सातत्याने साठत आहे. या भूवैज्ञानिक दाबामुळे वरच्या हिमालयीन प्रदेशाची उंची दरवर्षी 4 ते 6 मिलीमीटरने वाढत असल्याचेही संशोधनात स्पष्ट झाले आहे.
अभ्यासकांच्या अंदाजानुसार, ही साठलेली अवाढव्य ऊर्जा भविष्यात 8.1 तीव्रतेचा अत्यंत विनाशकारी भूकंप घडवून आणू शकते. विशेष म्हणजे, गेल्या कित्येक शतकांपासून या प्रदेशात कोणताच मोठा भूकंप झालेला नाही आणि इतिहास साक्षी आहे की अशा दीर्घकालीन शांततेनंतर साठलेली ऊर्जा एकाच वेळी मोठ्या धक्क्याच्या रूपाने बाहेर पडते. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की हा इशारा केवळ भीती निर्माण करण्यासाठी नसून, भविष्यातील संभाव्य मानवी व जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने आत्तापासूनच सतर्क होणे गरजेचे आहे. उत्तराखंड आणि संपूर्ण हिमालयीन क्षेत्रात कठोर प्रशासकीय नियम लागू करणे, आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी मजबूत करणे आणि केवळ भूकंपरोधक बांधकामांनाच प्राधान्य देणे आता अत्यंत आवश्यक बनले आहे.


























































