
दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने प्रेयसीवर आज नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात दिवसाढवळ्या चाकूहल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीचा मृत्यू झाला. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी प्रियकर दानीश मोहम्मद अन्सारी याला अटक केली आहे.
ऍण्टॉप हिलमध्ये राहणारी सादिया जाहीर शेख (21) ही तरुणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राऊण्ड स्टाफ म्हणून काम करीत होती. ती नेहमीप्रमाणे जीटीबी नगर येथून लोकलने आली आणि नेरुळ स्थानकात सकाळी पावणेसात वाजता उतरली. बस पकडण्यासाठी ती स्थानकाच्या पूर्व प्रवेशद्वाराबाहेरील बसथांब्याजकळ जात असताना तिच्या मागावर असलेल्या आरोपी दानिशने तिला बसथांब्याजकळ गाठले. त्यानंतर त्याने तिच्या पाठीवर, पोटावर, मानेवर आणि छातीवर पाच ते सहा वार करून पळ काढला.
सादिया आणि दानिश हे दोघेही मुंबईतील वडाळा येथील ऍण्टॉप हिल परिसरात राहत होते. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनी विकाह करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याबाबत कुटुंबीयांनाही त्यांनी माहिती दिली होती.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. सादियाचे अन्य तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय दानिशला होता. या संशयातून त्याने यापूर्वीही सादियाला मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी विमानतळ परिसरात तसेच ऍण्टॉप हिल पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत.

























































