प्रशिक्षणार्थी उड्डाणादरम्यान बॉम्बर विमान कोसळले, रशियन हवाई दलाला मोठा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशिक्षणार्थी उड्डाणादरम्यान रशियन हवाई दलाचे Tu-22M3 हे स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमान सायबेरियातील इर्कुत्स्क प्रदेशात कोसळले. सुदैवाने विमानातील चारही वैमानिकांनी वेळेत घेतल्याने ते बचावले असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. चौघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, कामेन्का गावाजवळ हे विमान कोसळल्याचे इर्कुत्स्कचे गव्हर्नर इगोर कोब्झेव्ह यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. इंजिन निकामी झाल्याने हा अपघात घडला असावा असा अंदाज कोब्झेव्ह यांनी व्यक्त केला.

नाटोमध्ये ‘बॅकफायर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या Tu-22 हे सोव्हिएत काळातील सुपरसॉनिक बॉम्बर विमान आहे. रशियाने सीरिया आणि युक्रेनमधील लढायांमध्ये याचा वापर केला आहे. Tu-22M3 ही या विमानाची आधुनिक आवृत्ती आहे, जी Kh-22 क्रूझ क्षेपणास्त्रांसोबतच हवेतून डागता येणारी हायपरसॉनिक ‘किंझाल’ (Kinzhal) क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.