
90 च्या दशकातील लोकप्रिय विनोदी अभिनेते दिनयार तीरंदाज यांचे गुरुवारी वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले आहे. ‘पारसी झोरोस्ट्रियन वर्ल्डवाइड – हैदराबाद’ या सोशल मीडिया पेजवरून त्यांच्या निधनाची माहिती सर्वप्रथम समोर आली. या पोस्टनुसार, रुस्तम तीरंदाज यांचे बंधू दिनयार तीरंदाज आता आपल्यात राहिलेले नाहीत. मुंबईतील वाडिया बंगलो येथे दुपारी 3 वाजून 45 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजलेले नाही. त्यांच्या कुटुंबीयांकडून त्याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.
दिनयार यांच्या निधनाची बातमी समजताच चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले आहे. दिनयार तीरंदाज यांनी चित्रपटांमध्ये कधी मुख्य भूमिका साकारल्या नसतील, तरीही एक प्रतिभावान चरित्र अभिनेता म्हणून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि यशस्वी टप्पा म्हणजे 90 च्या दशकातील सुपरहिट विनोदी मालिका ‘जबान संभाल के’ हा होता. या मालिकेतील त्यांनी साकारलेली ‘मिस्टर केकी दारूवाला’ ही भूमिका हिंदुस्थानी प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. त्यांची जबरदस्त संवादफेक आणि हिंदी बोलतानाची वैशिष्ट्यपूर्ण पारशी धाटणी प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडायची. याशिवाय त्यांनी दूरदर्शनवरील गाजलेली मालिका ‘नुक्कड’ आणि ‘ब्योमकेश बक्षी’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.
टीव्ही मालिकांसोबतच दिनयार यांनी मोठ्या पडद्यावरही आपला विशेष ठसा उमटवला. त्यांनी 1984 मध्ये रमेश तलवार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘दुनिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, ज्यात त्यांना दिलीप कुमार आणि ऋषी कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात ‘चलते चलते’, ‘हॅलो ब्रदर’, ‘मैंने प्यार किया’, ‘दिल है के मानता नहीं’, ‘क्या कहना’, ‘अलबेला’, ‘दरार’ आणि ‘कमाल धमाल मलामाल’ यांसारख्या अनेक सुप्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे.





























































