
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे.
आतापर्यंत राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात 4 हजारांहून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल.






























































