
प्रभू श्रीरामांच्या मंदिरात भाजपच्याच लोकांनी चोरी केली असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच देशात रामाचं नाही तर चोरांचं राज्य असे म्हणत अयोध्येला जाण्याचीही घोषणा केली.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मी कोणत्याही पक्षाचं नाव घेऊन बोलत नाही. गेल्या 12 वर्षातली लोकशाहीची, संविधानाची आणि देशातल्या एकूण संस्थांची अवस्था पाहता काँग्रेस पक्ष अधिक मजबुतीने समोर आला पाहिजे. त्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करत आहेत. पण त्यांना अधिक मजबुती मिळण्यासाठी काँग्रेस पक्षातून वेळोवेळी अनेक नेते बाहेर पडले. त्यांनी पुन्हा एकत्र करून मूळ काँग्रेस मजबूत करावी ही भूमिका मी मांडली. या संदर्भात कुठल्या घटकाने काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण या संदर्भात आता राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे आणि काही हालचाली सुरू झाल्या आहेत, त्याचे स्वागत केले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
अयोध्येतल्या राम मंदिरात श्रीरामाच्या दानपेटीतून आतापर्यंत पाच कोटींचा अपहार झाला आहे. ही बातमी धक्कादायक आहे. हे एक प्रकरण समोर आले आहे. प्रत्यक्ष अयोध्येच्या राम मंदिरातील दानपेटीलाच हात घालण्याचे धाडस कोणता हिंदुत्ववादी करत असेल? दहशतवाद्यांपासून मंदिराला धोका आहे असे तुम्ही उठसूट म्हणत असता. मग दानपेटीतून पैसे चोरणारे हे अतिरेकी कोण आहेत? ते चोर सीसीटीव्हीत दिसले. जेव्हा ही बाब समोर आली तेव्हा ते सीसीटीव्ही गायब करण्यात आलं. राम मंदिराची आणि ट्रस्टची संपूर्ण जबाबदारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराकडे आहे. मग हे घरातले चोर आणि दरोडेखोर आहेत का? पंतप्रधान होऊन 12 वर्ष झालेल्या नरेंद्र मोदींनी या मंदिराचा सोहळा केला होता. आणि 8-10 दिवस बसून व्रत आणि तप केलं, त्या मंदिरात प्रभू श्रीरामांचे पाच कोटी रुपये चोरणारे 100 टक्के भाजपचेच लोक आहेत. हे कळल्यापासून आम्ही आणि उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. काल उद्धव ठाकरे आणि आमची चर्चा झाली. त्यावर आमचं असं ठरलं आहे की, कदाचित अयोध्येतून रामाचं बोलवणं आलं असावं. आम्ही पुन्हा अयोध्येत यावं आणि या विषयावर तोंड फोडावं. शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्यामुळे त्या देणग्यांचे महत्त्व आम्हाला माहित आहे. आम्ही पहिल्याच दिवशी एक कोटी रुपयांचा धनादेश हा राम मंदिर ट्रस्टला दिला होता. नंतर खुप जणांनी गुप्त दान दिलं होतं, आमचं उघड दान दिलं होतं. या दानपेटीचे चोर कोण, त्यात कुणाचा हात आहे, हे पैसे वारंवार कोण पळवतंय, सीसीटीव्ही फुटेज गायब का करण्यात आलं, याबाबत चौकशी का होत नाही? पंतप्रधान मोदी यांनी या मंदिराचे राजकारण करून मतं मागितली, ते याबाबत का गप्प आहेत? या ट्रस्टचे अध्यक्ष रुपेंद्र मिश्रा हे का गप्प आहेत. या भागातील भाजपचे नेते रुपेंद्र मिश्रा म्हणाले की, माझ्याकडे याबाबत पूर्ण माहिती आहे. पण ही इतकी मोठी माणसं आहेत की, ती माहिती बाहेर काढली तर माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. राम मंदिर लुटण्याच्या प्रक्रियेत नक्की कोण सहभागी आहेत की बृजभूषणसिंह सारख्या बाहुबलीलाही भीती वाटते. ही अत्यंत गंभीर विषय आहे. अयोध्येला जाण्याची योजना आम्ही लवकरच जाहीर करू. उद्धव ठाकरे स्वतः अयोध्येत जाणार आहेत. हे लोक जर राम मंदिरात चोऱ्या करू शकतात तर निवडणूक चोरणं, मतं चोरणं हे काहीच नाही त्यांच्यासाठी. यांना राम मंदिरातील पाच कोटी चोरताना भिती आणि लाज वाटत नसेल तर मतं चोरणं, ईव्हीएमचा ताबा घेणं, संविधान ताब्यात घेताना त्यांना काहीच वाटणार नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
याबाबत अयोध्येत जाऊन आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करू. राम मंदिरात पैशांची अफरा तफर होते हे सिद्ध झालेले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी करतानाचे दृश्य दिसतंय आणि नंतर जसं मतं चोरतात तसे हे सीसीटीव्ही फुटेजही चोरतात. या देशात रामाचं राज्य नसून चोरांचं राज्य आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते आहेत त्यांना स्वतंत्र भूमिका आहे, त्यात बीजेडीचे नवीन पटनाईक, शरद पवार, जगमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी, केसीआर हे सर्व आधी काँग्रेसमध्ये होते. यात शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. हे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांची सुरुवातीपासूनची विचारधारा काँग्रेसची आहे. त्यांनी या सर्वांसाठी पुढाकार घेऊन एक मजबूत काँग्रेस पक्ष उभा केला तर आमच्यासारखे प्रादेशिक पक्षांना बळ मिळेल. जर आपल्याला केंद्रातल्या बकासुराशी आणि सैतानाशी लढायचं असेल तर पांडवाच्या बाजूने जसे अनेक घटक उभे राहिले, तसंच मूळ विचाराच्या पक्षांनी काँग्रेससोबत उभं राहिलं पाहिजे, अन्यथा ते पक्षेही नष्ट केले जातील, असेही संजय राऊत म्हणाले.



























































