
>>पराग खोत
आयुष्यात अनेक नाती येतात. काही काळाच्या ओघात विरून जातात, काही तुटतातही; पण मनाच्या एका कोपऱ्यात कायम घर करून राहते ती मैत्री. शाळेचा बाक, कॉलेजचा कट्टा, कँटीनमधल्या गप्पा, एकमेकांच्या काढलेल्या खोडय़ा, संकटात दिलेला खांदा आणि यशाच्या क्षणी मारलेली मनमोकळी मिठी… या सगळ्या आठवणी काळाच्या धुळीत झाकल्या गेल्या तरी कधीच पुसल्या जात नाहीत. याच आठवणींच्या कपाटाची किल्ली उघडणारा आणि मनाला जुन्या दिवसांच्या सफरीवर घेऊन जाणारा कार्यक्रम म्हणजे ‘दोस्तीचं दुकान.’
हे रूढार्थाने नाटक नाही; हा एक प्रयोग आहे. मुक्तनाटय़ाचा बाज वापरून, मोजपंच नेपथ्य आणि प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला ताण देऊन बिटविन द लाईन्स वाचायला लावणारं हे एक वेगळं रसायन आहे. सध्या असे अनेक मुक्तछंद मराठी रंगभूमीवर अवतरले आहेत आणि आपल्या पंटेटच्या बळावर ते तरुण प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवतायत. आठवणी आणि बरंच काही… असं ह्या कार्यक्रमांचं स्वरूप आहे. इथेही त्यातलं बरंच काही मौजूद आहे. या प्रयोगाच्या नावातच एक वेगळी गंमत आहे. दुकान म्हटलं की खरेदी-विक्री, व्यवहार, नफा-तोटा आठवतो. पण इथे विकलं जातं ते हसू, आठवणी, भावना आणि जपलेली माणसं. या दुकानात किंमत नाही, पण मोल आहे; व्यवहार नाही, पण आपलेपणा आहे; आणि नफा-तोटय़ाचा हिशेब नाही, पण जिवाभावाच्या मैत्रीची श्रीमंती आहे.
ह्या कथेत पाच मित्र आणि एकुलती एक जिवाभावाची मैत्रीण आहे. त्यांना नावे आहेत, त्यांची प्रत्येकाची स्वतःची एक ओळख आहे, त्यांचे उद्योग आहेत. पण ती नावे इथे मुद्दामच देत नाही, कारण ह्यातल्या प्रत्येकाला तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राचं किंवा मैत्रीणीचं नाव द्याल इतकी ती आपल्या खऱ्या आयुष्यातली आहेत. या कथेतल्या मध्यवर्ती पात्राचं लग्न ठरलंय, अगदी उद्यावर आलंय. पण तो आता गोंधळलेल्या अवस्थेत आहे. उद्या हे लग्न करावं की नाही ह्या संभ्रमात आहे. म्हणायला तो ह्या नकाराला खर्चिकतेचं कारण देतोय. वीस लाख रुपये खर्चून हे लग्न करायचं नाही असं म्हणतोय. पण आतलं कारण काही वेगळं असू शकेल इतके पदर त्या कथेला आहेत. ग्रुपमधल्या त्या एकुलत्या एक मैत्रिणीसोबत असलेलं त्याचं सुंदर नातं संपुष्टात आलं असलं तरी कुठेतरी तो अदृश्य धागा अजून तुटलेला नाहीये. या सगळ्या परिस्थितीत तो आपल्या ह्या मित्रांना भेटायला आणि त्याच्या ह्या परिस्थितीवर तोडगा काढायला बोलावतो. त्यानंतर नृत्य-नाटय़-संगीतातून आठवणींचा जो कोलाज आपल्यासमोर मांडला जातो ते हे दोस्तीचं दुकान होय.
लेखक दीप डबरे यांनी मैत्रीच्या नात्याचे विविध रंग अत्यंत सहजतेने उलगडले आहेत. संवादांमध्ये सहजता आहे. एखादा किस्सा ऐकताना आपल्याही ग्रुपमधील एखादा मित्र डोळ्यासमोर उभा राहतो, तर एखाद्या प्रसंगात नकळत आपल्या कॉलेजच्या दिवसांची पानं उलटू लागतात. या प्रयोगातील गाणी ही केवळ मनोरंजनासाठी वापरलेली नाहीत. प्रत्येक गाणं मैत्रीच्या भावविश्वाला अधिक समृद्ध करतं. जुन्या आठवणींना स्वरांची जोड मिळते आणि सभागृहात बसलेला प्रत्येक प्रेक्षक काही क्षणांसाठी आपल्या भूतकाळात हरवून जातो. गाणी, किस्से आणि गप्पांचा हा मिलाफ इतका सहज घडतो की प्रयोग संपेपर्यंत प्रेक्षकांना वेळेचं भान राहत नाही.
दिग्दर्शक सिद्धेश धुरी यांनी या संकल्पनेला अत्यंत संवेदनशीलतेने हाताळलं आहे. भावनिक क्षणांचा अतिरेक न करता त्यांनी कार्यक्रमाला एक नैसर्गिक प्रवाह दिला आहे. उलट हसता हसता डोळ्यांच्या कडा ओलावून जातात आणि मन नकळत जुन्या मित्रांना पह्न करण्यासाठी आतुर होतं. आज सोशल मीडियाच्या युगात हजारो ‘फ्रेंड्स’ असतात, पण खऱ्या अर्थाने मन मोकळं करता येईल असे मित्र किती असतात? हा प्रश्न ‘दोस्तीचं दुकान’ अत्यंत हळुवारपणे विचारतं. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेल्या पिढीला हे साद घालतं की मैत्री ही केवळ ‘लाईक’ आणि ‘इमोजी’ची भाषा नसून ती जगायची, अनुभवायची आणि जपायची भावना आहे.
मात्र यात काही त्रुटी आहेत. वैदर्भीय बोलीचा जास्तच पगडा असलेल्या आणि कधी बोलीभाषा तर कधी प्रमाण मराठी भाषा बोलणारी पात्रे असल्याने प्रवाह खंडित झाल्यासारखा वाटतो. प्रमाण भाषेच्या डाळीला जर बोलीभाषेची झणझणीत पह्डणी दिली तर संवादांची चविष्ट आणि रुचकर आमटी तयार होईल असे वाटते. यातली गाणी आणि नृत्य एक प्रमुख पात्र आहेत, त्यामुळे ध्वनिसंयोजनावर अधिक काम व्हायला हवे. तसेच ह्यातल्या संवादिनी, गिटार आणि ढोलकीसोबतच वापरलेला डफ हे वाद्य म्हणून आहे की प्रॉपर्टी म्हणून हे कळत नाही. त्याचा अधिक सुयोग्य वापर व्हावा. नेपथ्य अजून देखणे करायला वाव आहे. एपंदरीत प्रयोग अजून देखणा होऊ शकतो आणि जो होईल याची खात्री बाळगावी इतके प्रतिभाशाली कलाकार या प्रयोगात आहेत. जसजसे अधिक प्रयोग होतील तसतसं दोस्तीच्या या दुकानाची भरभराट होईल. नुकतेच ह्याचे प्रयोग सर्वत्र सुरू झाले आहेत. वाईड विंग्ज मीडिया, दृकश्राव्य आणि स्मृतिगंध या नाटय़संस्था हा आगळावेगळा प्रयोग आपल्यासाठी घेऊन आले आहेत. ‘दोस्तीचं दुकान’ हा फक्त एक कार्यक्रम नाही; ती प्रत्येकाच्या आयुष्यातल्या सुंदर दिवसांची पुन्हा एकदा घेतलेली भेट आहे. जुन्या मित्रांच्या आठवणींनी मन भरून येत असेल, कॉलेजच्या कट्टय़ाची ओढ अजूनही मनात असेल, तर हे ‘दुकान’ एकदा नक्की फिरून यावं. कारण इथून बाहेर पडताना हातात काही नसतं, पण मन मात्र आठवणींच्या अमूल्य खजिन्याने भरून गेलेलं असतं. दोस्तीच्या दुकानातला तो कटिंग चहा पिण्यासाठी अवश्य या दुकानाला एकदा तरी भेट द्या.
संकल्पना, लेखन, गीत, संगीत ः दीप डबरे
रंगावृत्ती आणि दिग्दर्शन ः सिद्धेश धुरी
कलाकार ः निखिल पुजारी, ईशा किरण, सिद्धेश धुरी, स्वप्नील भावे, आदित्य मराठे आणि दीप डबरे
संगीत संयोजन ः दीप डबरे,
स्वप्नील भावे
वेशभूषा ः भक्ती मेढेकर
प्रकाश योजना ः यश पोतनीस
नेपथ्य रचना ः मयूर पवार, श्रद्धा दोशी
ध्वनी संयोजन ः सुनील पानसरे
निर्माते ः कुशल खोत, आदित्य मोडक आणि नितीश पाटणकर
प्रकाशक ः रोहित शुक्ल, अमित टिल्लू






























































