
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांच्या कामावर विभागप्रमुखांनी लक्ष ठेवावे, दोन महिन्यांत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामाची तपासणी केली जाईल, कर्मचाऱ्याचे काम समाधानकारक नसेल तर त्याला घरचा रस्ता दाखविला जाईल, असे निर्देश आयुक्त अमोल येडगे यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले.
मनपा विभागप्रमुखांची बैठक आयुक्तांच्या दालनात घेण्यात आली. या बैठकीत सुरुवातीला ई-ऑफिसवर जास्त लक्ष केंद्रीत करून कर्मचाऱ्यांनीही ई-ऑफिसचा वापर करावा याकडे लक्ष द्यावे, ई-ऑफिसमध्ये एकही संचिका प्रलंबित राहता कामा नये, विभागप्रमुखांनी ई-ऑफीसवर लक्ष द्यावे, असे निर्देश दिले.
घंटागाडीसाठी कंट्रोलरूम कार्यान्वित करा
शहरातील कचरा संकलन व वाहतूक करणाऱ्या घंटागाडीचे वेळापत्रक जाहीर झाले पाहिजे, जीपीएस सिस्टीमद्वारे मॅपिंग करून कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेत घंटागाडी पोहचणार हे पाहण्यासाठी तातडीने कंट्रोलरूम कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले.
कचऱ्याची ठिकाणे स्वच्छ ठेवा
ज्या भागातील रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत, भिंतीच्या आडोश्याला कचरा टाकला जातो, ती कचऱ्याची ठिकाणी स्वच्छ करा, त्या जागेवर पुन्हा कचरा टाकला जाणार नाही, याची काळजी घ्या, कायमस्वरूपी ती ठिकाणे स्वच्छ राहिली पाहिजे.
हजेरी अॅपवर लक्ष ठेवा
मनपातील कायमस्वरूपी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची हजेरी अॅपवरच हजेरी लागली पाहिजे. त्यासाठी हजेरी अॅपवर लक्ष ठेवावे. कंत्राटीच्या कर्मचाऱ्यांच्या कामावर विभागप्रमुखांनी लक्ष ठेवावे, दोन महिन्यांनंतर त्यांना बोलावून त्यांच्या कामाची तपासणी केली जाईल, काम समाधानकारक नसेलतर त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येईल, बिनकामाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढणार असून, कर्मचारी लागणार असतील तर त्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करणार असल्याचे आयुक्त येडगे यांनी सांगितले.
मनपाचे अॅप किती? कुणालाच माहिती नाही
स्मार्ट सिटीमार्फत महापालिकेसाठी तयार करण्यात आलेले सर्व अॅप कार्यान्वित करावे, त्यात सुधारणा घडवून आणावी, ए-आय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा विचार करावा, अॅपद्वारे नागरिकांना घरबसल्या सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी सूचना आयुक्त येडगे यांनी केली. त्याचवेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली की, मनपाचे अॅप किती आहेत? अॅपबद्दल विचारताच अधिकारी एकमेकांकडे पाहत होते. कुणालाच माहिती नाही, असे म्हणून याबद्दलची माहिती घ्या, अशी सूचना त्यांनी केली.
सफारी पार्कमधील झाडांसाठी एसटीपीचे पाणी द्या
मिटमिटा येथील प्राणिसंग्रहालयाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करण्यात आली आहे. तसेच नवीन वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागणार असून, पडेगाव येथील एसटीपीचे पाणी सफारी पार्कमधील विहिरीत आणून टाकण्यासाठी पाईपलाईन करावी लागणार आहे. त्यासाठी दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. झाडे जगविण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. तसेच सफारी पार्कच्या नियोजित सरकारी जागेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी अंदाजपत्रक तयार करावेत, अशी सूचना आयुक्त अमोल येडगे यांनी केली.






























































