
>> वैश्विक, [email protected]
एखाद्या कल्पनेची भरारी कृतीमध्ये उमटते आणि यशस्वी होते तेव्हा त्याला गगनही ठेंगणे भासते. आता केवळ आपल्याला दिसणारं निळं गगन आणखी धुंडाळत अवकाशात विहरणारे अनेक कृत्रिम उपग्रह आणि आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकही आपण जाणतो. आपला शुभांशु शुक्ला त्याच अंतराळस्थानकावर जाऊनही आला.
1957 मध्ये सुरू झाली मानवी कर्तृत्वाची अंतराळयात्रा. आधी छोटय़ा ‘स्पुटनिक-1’ ने अंतराळ कवेत घेतलं आणि आता व्हॉएजर-1 याच वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये 1 प्रकाशदिवस म्हणजे 26 अब्ज किलोमीटर पार करून सूर्यमालिकेपलीकडचं विश्व पाहत राहणार आहे. तिथून त्याला सातत्याने संदेश पाठवणे शक्य होईल का किंवा त्याचं भवितव्य काय? याचा विचार नंतर त्याविषयीच्या लेखात घेऊच.
या लेखात मात्र एका आगळ्यावेगळ्या उपग्रहासंबंधी. हा चिमुकला प्रायोगिक उपग्रह लाकडाचा होता! 2024 मध्ये जपानी कल्पकतेने त्याचा यशस्वी प्रयोग ‘नासा’च्या सहकार्याने घडवून आणला. त्याचं नाव ‘लिंगोसॅट.’ ते मात्र लॅटिन भाषेतल्या लाकडासाठीच्या शब्दावरून घेतले. या अवघ्या 10 घनसेंटिमीटर आकाराच्या उपग्रहाच्या जुळणीसाठी जे ‘होनोकी’ नावाचं खास जपानी लाकूड वापरण्यात आलं त्याविषयी आधी जाणून घेऊ.
मुळात ऍल्युमिनियम धातूचे शेकडो कृत्रिम उपग्रह अवकाशात यशस्वीरीत्या उडालेले असताना अचानक या ‘लाकडी’ उपग्रहाचं जपानी संशोधकांच्या कसं काय डोक्यात आलं? त्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या अवकाशात अनेक (काही हजार) निकामी उपग्रह त्यांचं काम संपवून रिकामटेकडे होऊन भिरभिरतायत. हे ‘लो अर्थ ऑर्बिट’वाले म्हणजे पृथ्वीपासून 300 ते 400 किलोमीटर अंतरावरून पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह बिनकामाचे झाले की, ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने खेचले जाऊन नष्ट होईपर्यंत तसेच भरकटत राहतात आणि काही वेळा धोकादायक ठरू शकतात.
पृथ्वीवर सुमारे 75 टक्के समुद्रच असल्याने निकामी उपग्रहांचे अवशेष भूभागावर, वस्तीवर कोसळण्याची शक्यता कमी असली तरी अशा अंतराळी वाहनांचे तुकडे मानवी वस्तीत, शेतात वगैरे पडल्याची नोंद आहेच. यावर उपाय म्हणजे असे पृथ्वीनिकट (लो अर्थ) उपग्रह कार्यकाळ संपवतील तेव्हा त्यांनी पृथ्वीवासीयांना त्रास न देता वातावरणाच्या उष्णतेने तिथेच विलीन होण्यासाठी उत्तम माध्यम लाकडाचं हे जपानी संशोधकांच्या लक्षात आलं. याचा आणखी एक फायदा म्हणजे ऍल्युमिनियमध्ये पृथ्वीनिकट उपग्रह कोसळून वातावरणात जळून गेले तरी त्यातून ऍल्युमिनियमची ‘फाइन पार्टिकल्स’ (सूक्ष्म कण) वातावरणात मिसळून प्रदूषण वाढतंच. लाकूड जळल्यावर केवळ राख आणि थोडासा कार्बन यापलीकडे काहीच नाही.
त्यासाठीच जपानमध्ये प्राचीन काळापासून घरांपासून राजप्रासादांच्या बांधणीसाठी प्रसिद्ध असलेले ‘होनोकी’ किंवा मॅग्नोलिया झाडांचं लाकूड वापरण्याचं ठरलं. हे झाड 50 ते 150 फूट वाढतं. परिपक्व झाडाचा बुंधा (खोड) 1 ते 3 मीटर व्यासाचा असतो. त्याला काहीसा सुगंध येतो. विशेष म्हणजे ‘होनोकी’ लाकूड जलरोधक आहे. पाण्यात ते कुजत नाही. दरवर्षी फूटभर आणि सरळ वाढणाऱया या झाडाचं लाकूड तिथे पूर्वापार बोटी बनवण्यासाठीही वापरलं जातं. त्याची वाढ तुलनेने हळू होत असली तरी जपानमध्ये त्याची दाट जंगलं आहेत.
पुढचा प्रश्न असा होता की, ‘होनोकी’ लाकडाची गुणवत्ता पृथ्वीवर सिद्ध झाली असली तरी त्यापासून बनवलेला उपग्रह प्रचंड वेग, उष्णता आणि थंडी सोसेल का? कारण पृथ्वीनिकट उपग्रहांचा वेग ताशी सुमारे 28000 किलोमीटर असतो. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाविरोधी भ्रमण करण्यासाठी त्याला एवढय़ा वेगाची गरज असते. निर्वात पोकळीत वातावरणाचं घर्षण नसलं तरी उड्डाणाच्या काळात ते सहन होणं आणि पृथ्वीभोवती 90 ते 95 मिनिटांत परिक्रमा करताना 45 मिनिटं ‘दिवस’ म्हणजे प्रखर सूर्यप्रकाश आणि 45 मिनिटे ‘रात्र’ म्हणजे कमालीची शीतलता अशा विषम हवामानात टिकणं ही ‘होनोकी’पासून बनवलेल्या ‘लिंगोसॅट’ची परीक्षाच होती.
त्यात तो अक्षरशः ‘पास’ झाला. 5 नोव्हेंबर 2024 ला उडालेल्या लाकडी ‘लिंगो’ला कुठेही तडा गेला नाही. तो वाकडा-तिकडा (डिफॉर्म) झाला नाही की त्याचा कोणताही भाग निखळला नाही. त्याच्या लाकडी ‘देहा’ला कॉस्मिक रेडिएशन (वैश्विक प्रारणे) काही अपाय करू शकलं नाही. फक्त तो एकसंध (वनपीस) असल्याने सुरुवातीला त्याच्या पृथ्वी संपर्कात काही अडथळा आल्याचं म्हटलं जातं, पण नंतर त्याने शेवटपर्यंत सुरळीत कार्य केलं.
असे छोटे उपग्रह त्यांच्या पृथ्वीनिकटतेनुसार गरजेच्या वेगाने फिरतात. याउलट पृथ्वीच्या गतीशी तंतोतंत जुळवून घेणारे आणि अंतराळात 36800 किलोमीटरवरून फिरणारे भूस्थिर (जिओसिक्रोनस) उपग्रह मात्र ताशी 11000 कि.मी. वेगाने फिरतात. उपग्रह पृथ्वीच्या जितका जवळ तितका त्यावरचा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आणि त्याचा वेगही अधिक असं सूत्र. त्यात ‘लिंगोसॅट’ने बाजी मारली. अवघ्या 900 ग्रॅम वजनाच्या या लाकडी उपग्रहाने इतिहास घडवला हे खरंच, पण मोठय़ा उपग्रहांसाठी ‘लाकूड’ माध्यम चालेल? ते आगामी काळातील प्रयोग ठरवतील.






























































