आधी पोटात कोपर मारलं नंतर… कारमध्ये आईस्क्रीम सांडलं म्हणून आईच्या प्रियकराने केली चिमुकलीची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कारमध्ये आईस्क्रीम सांडलं म्हणून आईच्या लिव्ह इन पार्टनरने मुलीच्या पोटात जोरात कोपर मारलं. त्यानंतर त्याने मुलीचे तोंड दाबून धरले यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर पोलीस तपासात आईचा प्रियकर मोहनन याने कबूली दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर आई प्रियांका ही फरार आहे.

६ वर्षीय पी. वेन्नेला ही प्रियांका आणि प्रवीण यांची मुलगी होती. प्रवीण सोबत घटस्फोट झाल्यानंतर प्रियांका मोहननसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. प्रियांका व प्रवीणची मोठी मुलगी प्रवीणसोबत तर लहान मुलगी प्रियांका सोबत राहायची.

24 मार्च रोजी ही घटना घडली आहे. मोहन, प्रियांका आणि प्रियांकाची 6 वर्षांची मुलगी वेन्नेला हे तिघे होसकोटे येथून बिर्याणी खाऊन घरी परतत होते. त्यांनी आईस्क्रीम देखील घेतले होते. वेन्नेला गाडीत आईस्क्रीम खात असताना तिच्या हातून ते गाडीच्या सीटवर पडले. आईस्क्रीम सांडल्याने ती दुसऱ्या आईस्क्रीमसाठी रडू लागली. तिच्या रडण्याचा राग आल्याने मोहनने तिच्या पोटात जोरात कोपर मारले व त्यानंतर तिचे तोंड दाबले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी नैसर्गिक मृत्यूचा बनाव रचला.

मात्र मुलीच्या मृत्युवरून तिचे वडील प्रवीण यांना मोहनन व प्रियांकावर संशय आला होता. त्यामुळे त्यांनी मोहननविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर खुनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 4 जूनला मोहनला अटक केली.

८ जून रोजी आलेल्या हिस्टोपॅथॉलॉजी (Histopathology) अहवालात वेन्नेलाच्या पोटात गंभीर अंतर्गत दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटात झालेली गंभीर अंतर्गत दुखापत आणि तोंड दाबल्यामुळे श्वास गुदमरून या चिमुरडीचा मृत्यू झाला.