
राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोसम गावाजवळ रेल्वे ट्रॅकच्या परिसरात सुमारे ३० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ट्रॅकमनला बुधवारी रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळला.
मृताच्या डोक्याला तसेच डाव्या व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून कमरेच्या डाव्या बाजूलाही जखम असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह राजापूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पंचनामा करून शवविच्छेदनासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. मृताची ओळख अद्याप पटलेली नसल्याने पोलिसांकडून विविध स्तरांवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
मृताचा चेहरा स्वच्छ करून तंत्रज्ञानाच्या मदतीने चेहऱ्याची पुनर्रचना (फेस रीकन्स्ट्रक्शन) करण्यासाठी संबंधित यंत्रणेला पत्र देण्यात आले आहे. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पाटील गटांवर मृताचे छायाचित्र पाठवून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे स्थानकांवर कोणतीही बेपत्ता व्यक्तीची नोंद आहे का,याचीही खात्री करण्यात येत असून त्याबाबत रेल्वे प्रशासनालाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
तपासाच्या दृष्टीने मृताच्या हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात आले असून त्याद्वारेही ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख करीत आहेत.






























































