
मध्य प्रदेशातून काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला. त्यामुळे तिथली राज्यसभा निवडणूक ही बिनविरोध झाली असून भाजपचे तीनही उमेदवार जिंकून आले आहेत. यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप व निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.
”’व्होट चोरी’ आणि ‘सरकार चोरी’ नंतर – भाजप आणि निवडणूक आयोगाने निवडणूक सुरू होण्यापूर्वीच ‘सीट चोरी’ करून स्पर्धाच संपवून टाकली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांनी सर्व कागदपत्रे सादर केली होती. कोणतीही प्रलंबित प्रकरणे नव्हती. निवडणूक आयोगाने भाजपच्या एका फालतू हरकतीवरून त्यांचे नामांकन रद्द केले. दुसरीकडे, भाजपचे समर्थन असलेले अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी जी यांनी अर्जावर स्वतःचे नावच चुकीचे लिहिले आणि अनेक अनिवार्य खुलासेही टाळले. तरीही निवडणूक आयोगाने त्यांना सर्व गोष्टी सुधारण्यासाठी मुदतवाढ दिली. तोच निवडणूक आयोग, दोन उमेदवार, एकाला संधी न देताच अपात्र ठरवले गेले, तर दुसऱ्याने नियम न पाळूनही त्याला बक्षीस देण्यात आले. जेव्हा काँग्रेसने बैठकीची मागणी केली, तेव्हा निवडणूक आयोगाने आधी आम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आम्ही शेवटी त्यांना भेटलो, तेव्हा ते एक शब्दही बोलले नाहीत. अशा गोष्टी आणखी बऱ्याच पाहायला मिळतील अशी अपेक्षा ठेवा. कारण भाजपसाठी निवडणूक जिंकण्यापेक्षा ती आधीच ‘फिक्स’ करणे खूप सोपं झालं आहे” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.



























































