Ahilyanagar news – जमीन संपादनाच्या भरपाईसाठी 1.20 लाखांची लाच मागितल्याप्रकारणी महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय महामार्ग-५४८ डी प्रकल्पांतर्गत संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महसूल विभागातील दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

मंगेश बाळासाहेब दुगणे (महसूल सहाय्यक, उपविभागीय अधिकारी कार्यालय, श्रीगोंदा-पारनेर विभाग) आणि अमोल काशिनाथ खामकर (कंत्राटी कर्मचारी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील एका शेतकऱ्याची सुमारे १४३ गुंठे जमीन रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी संपादित करण्यात आली होती. या बदल्यात शासनाकडून तब्बल १ कोटी ४७ लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली होती. ही भरपाई खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक असलेली ‘एफटीओ’ मंजुरी मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपींनी १ लाख २० हजार रुपयांची मागणी केली.

तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे दाद मागितली. ४ मे २०२६ रोजी झालेल्या मोबाईल संभाषणाची पडताळणी केल्यानंतर, ६ मे रोजी केलेल्या कारवाईत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. महसूल सहाय्यक मंगेश दुगणे यांच्या सांगण्यावरूनच कंत्राटी कर्मचारी अमोल खामकर याने ही लाच मागितल्याचे समोर आले आहे.