समुद्रात मोठा अनर्थ टळला! हिंदुस्थानी नौदलाने तेल टँकरवर धडकलेले जिवंत क्षेपणास्त्र केले निकामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी नौदलाने अत्यंत धोक्याची मोहीम यशस्वी करत अरबी समुद्रात मोठी दुर्घटना टाळली आहे. कोचीकडे येणाऱ्या एका तेलवाहू जहाजावर धडकलेले पण न फुटलेले क्षेपणास्त्र नौदलाच्या विशेष पथकाने अत्यंत शिताफीने बाहेर काढून सुरक्षितपणे निकामी केले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, एमटी ऑलिम्पिक लाईफ नावाचे मार्शल आयलँड्सच्या ध्वजाखाली चालणारे हे जहाज संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) फुजैराह येथून कोचीच्या दिशेने येत होते. २६ मे २०२६ रोजी ओमानच्या किनारपट्टीजवळ असताना या जहाजाच्या बाह्यभागावर एक मोठा स्फोट झाल्याची नोंद झाली. जहाजावरील अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, त्यांच्या जहाजाला एका क्षेपणास्त्राने धडक दिल्याचे आणि त्याचा स्फोटक भाग न फुटता जहाजातच अडकल्याचे लक्षात आले. यानंतर या धोक्याची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि न फुटलेल्या क्षेपणास्त्रासह हा टँकर कोचीच्या दिशेने आपला प्रवास करत राहिला. या जहाजावर एकही हिंदुस्थानी कर्मचारी नव्हता.

इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर – इंडियन ओशन रिजनद्वारे या धोक्याची माहिती मिळताच हिंदुस्थानी नौदलाने तातडीने समन्वयाने कारवाई सुरू केली. कोची येथील दक्षिण नौदल कमांडने स्फोटके निकामी करण्यात वाकबगार असलेल्या एक्सप्लोझिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजलच्या विशेष पथकाला जहाजावर पाठवले.

पथकाने केलेल्या पाहणीत असे दिसून आले की, क्षेपणास्त्राने जहाजाचा पत्रा भेदला होता आणि ते अनेक कप्पे पार करत थेट इंधनाच्या टाकीत जाऊन अडकले होते. इंधनाच्या टाकीत स्फोटक असल्याने ही कारवाई अत्यंत आव्हानात्मक आणि धोक्याची बनली होती.

जहाज त्यावरील कर्मचारी आणि बंदराच्या परिसरातील सुरक्षितता लक्षात घेऊन EOD पथकाने अत्यंत सावधगिरीने टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवली. सर्व सुरक्षा नियमांचे पालन करत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्फोटकाची डिटोनेशन मेकॅनिझम ओळखण्यात आली आणि ती निष्क्रिय करण्यात आली. त्यानंतर या क्षेपणास्त्राचा स्फोटक भाग आणि इतर अवशेष सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

बाहेर काढलेले हे स्फोटक आता पुढील तपासणीसाठी एका सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. ही अत्यंत धोक्याची मोहीम यशस्वी करून हिंदुस्थानी नौदलाने आपले तांत्रिक कौशल्य आणि जागतिक स्तरावरील एक जबाबदार सागरी सुरक्षारक्षक असल्याची आपली ओळख पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.