
ब्रिटिश आपला देश लुटून गेले. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या 12 वर्षांत त्यापेक्षा भयंकर ओरबाडणे सुरू आहे. पंडित नेहरूंनी एम्स, आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांची उभारणी केली. मोदींनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलिसांना उभारी देऊन संवैधानिक संस्थांच्या इमारती उखडून फेकल्या. नेहरूंना 12 वर्षांच्या काळात हे जमले नाही. ते राष्ट्रकार्य करत राहिले. मोदींनी 12 वर्षांत विध्वंसाचे, द्वेषाचे, विखंडतेचे राजकारण मजबूत केले. देशाची अर्थव्यवस्था त्यांच्या काळात पूर्णपणे दफन झाली, रुपया मृत झाला. निवडणूक आयोग, सरन्यायाधीश वगैरे लोक भाजप कार्यालयातले हरकामे बनले आहेत. एका वैभवशाली भारताची ही अवस्था मागच्या 12 वर्षांत झाली. या काळाचे नेतृत्व मोदी करत आहेत. पंडित नेहरूंना असे ‘विक्रमी’ कार्य करता आले नाही त्याबद्दल भारतमाता, भारत देश व जनता पंडित नेहरूंची सदैव आभारी राहील.
मोदी यांच्या वयाला आधी 75 वर्षे झाली व आता त्यांनी पंतप्रधानपदावर सलग 12 वर्षे पूर्ण केली. पंडित नेहरूंपेक्षा जास्त काळ ते या पदावर आहेत. हा नवा विक्रम प्रस्थापित केल्याने त्यांच्या आनंदास पारावार उरलेला नाही. दिल्लीत त्यांनी सगळ्यांसाठी एका ‘पार्टी’चे आयोजन केले आहे. वयाची 75 वर्षे झाली या विक्रमाची नोंद होऊ शकली नाही. कारण गुजरातचेच मोरारजी देसाई हे 81 व्या वर्षी पंतप्रधान झाले. नरसिंह राव हेसुद्धा उशिरा पंतप्रधान झाले व त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी दिली. मनमोहन सिंग यांनीही देशाला आर्थिक स्थैर्य दिले. नेहरू ते मनमोहन सिंग या कालखंडात मोदी कुठेच बसत नाहीत. मोदींना पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर 12 वर्षे झाली, पण त्याचा देशाला काही फायदा झाला काय? मोदी यांचे चमचे म्हणजे चमत्कार आहे. मोदी यांनी 12 वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही असे उपमुख्यमंत्री मिंधे सांगतात. मोदी हे ‘सुट्टी’साठी त्यांचे आलिशान विमान घेऊन जगातील अनेक देशांत जातात. अलीकडेच इटली, नेदरलॅण्ड वगैरे देशांत ‘सुट्टी’ घालवून आले. मोदी सदैव ‘सुट्टी’वरच असतात. मोदी तसे दयाळू आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यासह 80-85 न्यायाधीशांना लंडन येथे सुट्टीवर पाठवले व त्यांच्या दिमतीला देशाच्या कायदा मंत्र्यांना पाठवून न्यायमूर्तींच्या पाहुणचारात काही कमी राहता कामा नये याची काळजी घेतली. हा एक अनोखा विक्रम आहे. पंडित नेहरूंना असे विक्रम प्रस्थापित करणे जमले नाही. नेहरूंचा पंतप्रधानपदावर राहण्याचा रेकॉर्ड मोदींनी मोडला. मात्र
नेहरूंचा विक्रम
हा वर्षे, महिने आणि दिवस मोजून तोडता येणार नाही. नेहरूंनी त्यांच्या कालखंडात जे केले, राष्ट्राला जे दिले त्याची तुलना मोदींच्या 12 वर्षांशी करता येणार नाही. नेहरूंच्या काळात भारत देश प्रत्येकाला आपला वाटत होता. भारतमातेला जगात असंख्य मित्र होते व भारतमातेविषयी जगाला आदर होता. कारण नेहरूंसारखा स्वातंत्र्य लढ्यातला विद्वान सेनानी भारताचे नेतृत्व करत होता. समाजात जातीय, धार्मिक विद्वेषाचे विष नेहरूंनी कधीच मिसळले नाही. आज चित्र उलटे आहे. देश 2014 साली स्वतंत्र झाला व त्यानंतर मोदी हेच देशाचे प्रथम पंतप्रधान आहेत, मोदी यांनीच देश घडवला, असे ढोल पिटायला जगभरात भाडोत्री माणसे ठेवली आहेत. या भाडोत्र्यांना इतिहासाचे भान नाही. महाराष्ट्राचे एक मंत्री पंजाबात गेले व ज्यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले त्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’विरोधात टीकेच्या गुळण्या ओकून आले. देशाच्या रक्षणासाठी, अखंडतेसाठी अनेकांनी केलेले बलिदान मोदी व त्यांच्या लोकांच्या खिजगणतीत नाही, पण पुलवामातील 40 जवानांचे सामुदायिक हत्याकांड, पहलगाममधील 26 हिंदूंचे बलिदान हे मोदी काळात राजकीय निवडणुकांचे विषय ठरले. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ने भारताचे सेनापती जनरल अरुणकुमार वैद्य यांच्यासह शेकडो जवानांचे बळी घेतले. या सर्वोच्च बलिदानाला नाकारणारी राजकीय पिढी मोदी यांनी 12 वर्षांत तयार केली. वाजपेयींच्या काळात पाकिस्तानचे सैन्य भारतीय हद्दीत घुसले. भारताचे 562 सैनिक या युद्धात कामी आले. मग
कारगील युद्ध
हेसुद्धा मोदी व त्यांच्या लोकांना इतिहासातील काळा अध्याय का वाटू नये? मोदी यांनी 12 वर्षांत केलेल्या खोटेपणाचा हा कळस आहे. 12 वर्षांत नवे काय झाले, देशात व जगात आमची काय पतप्रतिष्ठा राहिली याचे निष्पक्ष ऑडिट होऊन जाऊ द्या. ब्रिटिश आपला देश लुटून गेले. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या 12 वर्षांत त्यापेक्षा भयंकर ओरबाडणे सुरू आहे. नेहरूंनी एम्स, आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांची उभारणी केली. मोदींनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलिसांना उभारी देऊन संवैधानिक संस्थांच्या इमारती उखडून फेकल्या. नेहरूंना 12 वर्षांच्या काळात हे जमले नाही. ते राष्ट्रकार्य करत राहिले. मोदींनी 12 वर्षांत विध्वंसाचे, द्वेषाचे, विखंडतेचे राजकारण मजबूत केले. देशाची अर्थव्यवस्था त्यांच्या काळात पूर्णपणे दफन झाली, रुपया मृत झाला. आयात-निर्यातीचा समतोल बिघडला आहे. परकीय चलनसाठा रिकामा होत आहे. देशहिताला तिलांजली देत केवळ मूठभर उद्योगपतींचा लाभ पाहिला जात आहे. बेरोजगारांची झुरळे झाली. नारी शक्ती अत्याचार, बलात्कारामुळे रोज आक्रोश करीत आहे. 80 कोटी जनता 10 किलो फुकट धान्यासाठी रांगेत उभी आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. निवडणूक आयोग, सरन्यायाधीश वगैरे लोक भाजप कार्यालयातले हरकामे बनले आहेत. एका वैभवशाली भारताची ही अवस्था मागच्या 12 वर्षांत झाली. या काळाचे नेतृत्व मोदी करत आहेत. पंडित नेहरूंना असे ‘विक्रमी’ कार्य करता आले नाही त्याबद्दल भारतमाता, भारत देश व जनता पंडित नेहरूंची सदैव आभारी राहील.

































































