
<< नीलेश कुलकर्णी
[email protected]
सम्राट चौधरी यांना बिहारचे मुख्यमंत्रीपद हे ‘जॅकपाट’सारखे आयते लाभलेले आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रगल्भता दिसत नाही. लालू व राबडीदेवी हे दोन माजी मुख्यमंत्री एकाच सरकारी बंगल्यात राहून सरकारी खर्च वाचवत आहेत याबद्दल खरे तर भाजप सरकारने यादव परिवाराचे आभार मानायला हवेत. मात्र विद्यमान मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना त्यांचा सरकारी बंगला खालच्या पातळीवरील राजकारणासाठी ‘प्यारा’ वाटू लागला आहे.
राजकारण्यांचे सरकारी बंगल्यावरचे प्रेम आपल्या देशात काही नवीन नाही. हे प्रेम इतके एकतर्फी की, मुदत संपल्यानंतरही सरकारी बंगल्यात राहण्याचा मोह सुटत नाही. सध्या बिहारमध्ये असाच एक बंगला गाजत आहे. तो आहे माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा ‘10, सर्क्य्लुर रोड’. राबडीदेवी या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या आहेत. या नात्याने त्यांचा सरकारी बंगल्यावरचा दावा योग्य व कायदेशीर आहे. मात्र, गेल्या कित्येक दशकांपासून लालू कुटुंबाच्या ताब्यातील हा बंगला भाजपचे नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या डोळ्यांत सलत असावा. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी या ‘10, सर्क्युलर रोड’मधून लालू कुटुंब हुसकावून लावणे हाच एककलमी कार्यक्रम सुरू केला आहे. विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद आहे आणि त्या पदावरील व्यक्तीला सरकारी बंगलाही मिळतो. राबडी देवी यांची मुदत 2030 मध्ये संपत आहे. ती संपल्यानंतर राबडीदेवींनी हा बंगला ताब्यात ठेवला असता तर त्यावरील कारवाई ही उचित होती. मात्र, सध्या सम्राट चौधरी ‘साप साप’ म्हणून भुई थोपटत आहेत हेच खरे.
सध्याचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी राबडीदेवींना या बंगल्यातून बाहेर काढा असे आदेश देऊन हाच बंगला दलित समाजातील मंत्री नंदकिशोर राम यांना आवंटित करण्याचे आदेशही काढले आहेत. याद्वारे ‘रविदास विरुद्ध यादव’ असे नरेटिव्ह रचण्याचा आणि विखारी राजकारण करण्याचा डाव चौधरी यांनी टाकला आहे. याद्वारे बिगर यादव जातींचे ध्रुवीकरण करण्याचा चौधरी यांचा प्रयत्न असला तरी त्यामुळे त्यांचे व पक्षाचे हसे झाले आहे. वास्तविक, लालू व नितीश कुमारांमध्ये उघड राजकीय वैर असूनही नितीश कुमार दहावेळा मुख्यमंत्री झाले तरी त्यांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही. लालू यादवांना बेघर करावे, असा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. नितीशबाबू हे प्रगल्भ नेते होते. सम्राट चौधरी यांना बिहारचे मुख्यमंत्रीपद हे ‘जॅकपाट’सारखे आयते लाभलेले आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रगल्भता दिसत नाही. लालू व राबडीदेवी हे दोन माजी मुख्यमंत्री एकाच सरकारी बंगल्यात राहून सरकारी खर्च वाचवत आहेत याबद्दल खरे तर भाजप सरकारने यादव परिवाराचे आभार मानायला हवेत. मात्र विद्यमान मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना त्यांचा सरकारी बंगला खालच्या पातळीवरील राजकारणासाठी ‘प्यारा’ वाटू लागला आहे.
‘माजीं’चे काय होईल?
भाजपने नितीन नवीन यांच्या नेतृत्वात संघटनात्मक बदल करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार पंजाबमध्ये सुनील जाखड यांच्या जागी पूर्वीचे काँग्रेसी केवलसिंग ढिल्लो, दिल्लीत वीरेंद्र सचदेवा यांच्या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा, हरयाणात मोहनलाल बडोलींच्या जागी अर्चना गुप्ता यांची निवड करण्यात आली, तर त्रिपुराचेही प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले. भाजपमध्ये या ‘माजी’ झालेल्या प्रदेशाध्यक्षांची एक कैफियत आहे. या पदावर राहिलेले नेते हळूहळू राजकारणात अडगळीत पडतात. त्यामुळे आपले पुढे काय? या चिंतेने या माजींना ग्रासले आहे. सुनील जाखड हे काँग्रेसचे दिग्गज नेते बलराम जाखड यांचे चिरंजीव. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याप्रमाणेच त्यांनाही भाजपमध्ये जाण्याची ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ झाली. आता पंजाबमध्ये पुढील वर्षी निवडणुका आहेत. मात्र, त्यात तिकीट मिळेल का? मिळाले तरी भाजपला जनाधार नसलेल्या पंजाबमधून निवडून येऊ काय? अशा एक ना अनेक प्रश्नांनी जाखड यांना ग्रासले आहे. मोहनलाल बडोली व वीरेंद्र सचदेवा यांची तर त्याहूनही करुण कहाणी आहे. सचदेवा तर जास्तच अभागी म्हणावे लागतील. तब्बल 27 वर्षांनंतर सचदेवा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दिल्ली विधानसभेत चमकदार विजय मिळवला. मात्र सरकार येऊनही त्यांच्या हाती काही सत्ता आली नाही. आता तर त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरही उदक सोडावे लागले आहे. दिल्लीच्या निवडणुकांना व लोकसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. तोपर्यंत सचदेवा यांचीही तगमग सुरूच राहणार आहे. हरयाणात ब्राह्मण मतदारांचे विजयी समीकरणातील महत्त्व लक्षात घेऊन भाजपने मोहनलाल बडोली यांना प्रदेशाध्यक्ष केले. निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना खड्यासारखे बाजूला करून पंजाबी समाजाच्या गुप्ता यांना प्रदेशाध्यक्ष केले. सचदेवा यांच्याप्रमाणेच बडोली यांच्यापुढेही ‘राजकीय बेरोजगारी’चा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे.
शिवकुमार यांची ‘इनिंग’
वीसेक वर्षांपूर्वींची घटना. द्वारकानाथ नावाच्या एका ज्योतिषाने म्हणे शिवकुमार यांना ‘‘तत्कालीन मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांना रात्री 2 वाजता कोणत्याही परिस्थितीत गाठा. तुम्हाला हमखास मंत्रीपद मिळेल.’’ असे भाकीत वर्तवले होते. योगायोगाचा भाग म्हणजे सीएम कृष्णा एवढ्या रात्री घरी जागे होते आणि मंत्रिमंडळातून कोणातरी एका प्रतिस्पर्ध्याची गच्छंती करावी यासाठी खलबते करत होते. समोर शिवकुमार यांना पाहताच कृष्णा यांनी शिवकुमार यांना मंत्री करण्याचे रातोरात ठरवले. ही संधी शिवकुमार यांच्यासाठी सुसंधी ठरली. ते मंत्री झाले. द्वारकानाथ यांनी माझ्या बाबतीत वर्तवलेले भाकीत शंभर टक्के खरे ठरले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी मुख्यमंत्री होत आहे, असे शिवकुमार यांनी प्रांजळपणे सांगून टाकले आहे. इतर नेत्यांसारखे शिवकुमार चोरून लपून ज्योतिष्यांकडे जात नाहीत, ते बेधडक आहेत. ढोंगी पुरोगामी नाहीत हे उल्लेखनीय.. बाकी शिवकुमार तुरुंगात गेले, ईडीशी लढले, पण दिल्लीला शरण गेले नाहीत. शिवकुमार हे मुख्यमंत्री झाले. काँग्रेससाठी ती एक सुवार्ता मानावी लागेल. शिवकुमार यांचा महाराष्ट्राशी तसा निकटचा संबंध आहे. विलासराव देशमुखांच्या सरकारवर विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे आमदार ‘सेफ’ ठेवण्याची कठीण जबाबदारी याच शिवकुमार यांच्या खांद्यावर होती. शिवकुमार यांनी ती लीलया पार पाडली होती. तेव्हापासून ते एका अर्थाने महाराष्ट्र काँग्रेसचे संकटमोचक बनले होते. असे हे शिवकुमार शेजारच्या राज्यात मुख्यमंत्री बनले आहेत.



























































