राम मंदिरात देणगी घोटाळा… कोट्यवधी रुपये गायब केले; अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिरात कोटय़वधी रुपयांचा देणगी घोटाळा झाला आहे. प्रभू रामचंद्रांच्या चरणावर भक्तांनी अर्पण केलेले सात कोटी रुपये गायब करण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे.

अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहिल्यापासून येथे भाविकांची रीघ लागलेली असते. त्यामुळे मंदिराच्या दानपेटीत मोठय़ा प्रमाणात दान येत असते. यातील काही दान वस्तू स्वरूपात, तर काही रोख रकमेच्या स्वरूपात असते. यातील पाच ते साडेसात कोटी रुपये गायब झाले आहेत, असे अखिलेश यांनी म्हटले आहे. अयोध्येचे माजी आमदार व माजी मंत्री पवन पांडेय यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. ‘पैशांची चोरी झाली नसेल तर मंदिर ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी समोर यावे आणि रामचंद्रांची शपथ घेऊन हे आरोप नाकारावेत, असे आव्हान पांडेय यांनी दिले आहे. चोरी झाली हे खरे असेल तर गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणीही त्यांनी केली.

निष्पक्ष चौकशी व्हायला हवी!

‘राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यापासूनच विविध घोटाळे उघडकीस येत आहेत. जमीन खरेदीसह अनेक बाबींवर यापूर्वीही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. प्रभू रामाच्या लाखो भक्तांची श्रद्धा या मंदिराशी जोडलेली आहे आणि म्हणूनच देणगीच्या रकमेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणे महत्त्वाचे आहे. या सगळ्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री पवन पांडेय यांनी केली.

ट्रस्टने फेटाळले आरोप

राम मंदिर ट्रस्टने अखिलेश यांचे आरोप फेटाळले आहेत. ‘ट्रस्टचे वेळोवेळी अंतर्गत ऑडिट होत असते. या ऑडिटच्या प्रक्रियेत ट्रस्टचे प्रतिनिधी आणि स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग असतो. ऑडिट अनेक दिवस चालते. सध्या ते काम सुरू आहे. आतापर्यंत घोटाळ्याची कुठलीही माहिती समोर आलेली नाही,’ असे चंपत राय यांनी सांगितले.

न्यायालयाने स्युमोटो दखल घ्यावी!

अखिलेश यादव यांनी यासंदर्भात ‘एक्स’ पोस्ट लिहिली असून न्यायालयाने या प्रकरणाची ‘स्युमोटो’ दखल घ्यावी आणि सखोल चोकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ‘मंदिरांच्या विश्वस्तांसाठी ही घटना लज्जास्पद आहे. इतका गंभीर आरोप होऊनही कोणीही खुलासा करण्यास अद्याप पुढे आलेले नाही. सरकारचे मौनही संशयास्पद आहे,’ असे अखिलेश यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘हा मुद्दा सनातनला मानणाऱ्या कोटय़वधी लोकांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे न्यायालयाने यात स्वतःहून लक्ष घातले पाहिजे,’ असेही अखिलेश यांनी पुढे नमूद केले आहे.