‘नेस्को’नंतर आता वरळी डोम, म्युझिक कॉन्सर्टमध्ये तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणाची पुनरावृत्ती शनिवारी वरळीतील एनएससीआय डोममध्ये घडली. लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमधील मद्याची झिंग तरुणाच्या जिवावर बेतली, तर एका महिलेची प्रकृती अत्यवस्थ बनली. महिलेवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही कॉन्सर्ट आयोजित केली होती. त्यात हजारो तरुण-तरुणींनी चार ते पाच तास नशेत डान्सचा धिंगाणा घातल्याची माहिती पुढे आली आहे.

गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये तीन महिन्यांपूर्वीच एप्रिल महिन्यात हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश करण्यात आला होता. त्या पार्टीत दोघांचा मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. ती घटना ताजी असतानाच शनिवारी वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) डोममधील तरुणाईचा नशेतील धांगडधिंगा समोर आला. तेथील लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये काही हजार तरुण-तरुणी, महिलांनी दुपारपासूनच सहभाग घेतला होता. मद्य आणि एनर्जी ड्रिंकचे सेवन करून अनेकांनी सतत चार ते पाच तास डान्स केला. याचदरम्यान मद्य आणि एनर्जी ड्रिंकचे सेवन केलेल्या वृषभ गांगुर्डे या तरुणाला असह्य त्रास झाला. तो कॉन्सर्टमध्येच खाली कोसळला. त्याला उपचारासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर काही अवधीतच आणखी एका महिलेला त्रास होऊ लागला. तिला जसलोक रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजते.

कॉन्सर्टमध्ये मद्यसेवनाला परवानगी मिळाली कशी?

लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टला ताडदेव पोलिसांनी सुरुवातीला परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतरदेखील हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कॉन्सटर्मध्ये मद्यसेवन कसे काय केले? मद्यसेवनाला परवानगी होती का? याचा सखोल तपास पोलिसांमार्फत केला जात आहे. म्युझिक कॉन्सर्टसाठी काही हजार रुपये शुल्क आकारले होते. साधारण पाच ते सहा हजार जणांनी कॉन्सर्टला हजेरी लावल्याचे समजते. घटनेच्या अधिक तपासात पोलीस वृषभ गांगुर्डेसोबत असणाऱ्या मित्राचा जबाब नोंदवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

डोम पार्टीशी कनेक्शन असलेल्या इतरांची चौकशी

डोम येथील घटनेनंतर ताडदेव पोलिसांनी तेथील डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. पोलिसांचे एक पथक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. तसेच पोलिसांनी पार्टी संबंधित असणाऱ्या काहींना चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरा दोघांची चौकशी झाल्याचे समजते.

आयोजकावर गुन्हा दाखल 

एनएससीआय डोम येथील संगीत कार्यक्रमा दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी आज रात्री उशिरा आयोजक असलेल्या कंपनीच्या सीईओ आणि मॅनेजर विरोधात गुन्हा नोंद केला. बीएनएस कलम 106 (1), 289 नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला
आहे.

दोघांनीही मद्य, एनर्जी ड्रिंक घेतल्याचे निष्पन्न

वृषभ गांगुर्डेबरोबरच प्रकृती अत्यवस्थ असलेल्या महिलेनेदेखील मद्य व एनर्जी ड्रिंक घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्याने ड्रग्जचे सेवन केले होते का, हे शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उघड होणार आहे. वृषभ व महिलेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.