
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज राज्यातील बारा मतदान केंद्रावर मतदान झाले. दिवसभरात तब्बल 3403 सभासद मतदारांपैकी केवळ 1698 जणांनी मतदान केले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी केवळ 49.90 टक्के इतकीच राहिली. निम्म्याहून अधिक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
राज्यभरात सर्वांत जास्त मतदान मुंबईमध्ये पाच मतदान केंद्रावर मिळून 539 इतके मतदान झाले. तर सर्वात कमी मतदान सोलापूर येथील एकाच मतदान केंद्रावर 63 इतके झाले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी 7 ते 5 या वेळेत राज्यातील बारा केंद्रावर मतदान झाले. यामध्ये मुंबई येथे पाच मतदान केंद्रावर 1573 पैकी 539 मतदान झाले. पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात तीन मतदान केंद्रावर 740 पैकी 517 मतदान झाले. पुणे जिह्यात दोन मतदान केंद्रावर 729 पैकी 460 मतदान झाले. नाशिक जिह्यात एका मतदान केंद्रावर 254 पैकी 119 मतदान झाले. तर सर्वांत कमी सोलापूर जिह्यातील एका मतदान केंद्रावर 107 पैकी 63 मतदारांनी मतदान केले.
आज कोल्हापुरात मतमोजणी
कोल्हापुरातील राम गणेश गडकरी सभागृहात उद्या मतमोजणी होणार आहे. महामंडळाच्या 17 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये सत्ताधारी समर्थ पॅनेल आणि विरोधात चित्रकर्मी पॅनेल या दोन प्रमुख गटांचे प्रत्येकी 14 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर 16 अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. आजच्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे उद्या मतमोजणीनंतर समजणार आहे.
मुंबई विभागाचे मतदान माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात पार पडले. मुंबईत पाच मतदान केंद्रावर 1569 पैकी 539 मतदारांनी मतदान केले. यामध्ये किशोरी शहाणे, जयवंत वाडकर, सोनाली खरे, केदार शिंदे, स्वप्नील जोशी, विजय गोखले, संजय जाधव, पुष्कर श्रोत्री, अभिजित पानसे, संदीप पाठक, उषा नाईक, प्रदीप वेलणकर, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, विद्याधर पाठारे, प्रशांत दळवी, मेघा घाडगे, प्रणव रावराणे आदींचा समावेश होता.




























































