
‘‘सीबीएसईचा घोळ चव्हाटय़ावर आणणाऱ्या 17 वर्षांच्या मुलाला पाकिस्तानी ठरवले. हे पत्रकारांना पाकिस्तानी ठरवतात. विरोधी पक्षांना पाकिस्तानी ठरवतात. मग हिंदुस्थानी आहे कोण? फक्त भाजपवाले आणि आयटी सेलवाले हिंदुस्थानी आहेत का,’’ असा सवाल कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज केला.
केंद्रीय परीक्षांमधील घोळाच्या विरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्यासाठी हिंदुस्थानात आलेले दिपके हे शनिवारी संध्याकाळी आपल्या घरी पोहोचले. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कॉक्रोचच्या कालच्या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली. अमेरिकेत राहून सरकारविरोधी अजेंडा चालवत असल्याची टीका काही जणांनी दिपके यांच्यावर केली होती. त्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. ‘‘मी आज तुमच्यासमोर बसलो आहे. काल दिल्लीत आंदोलन केले. एका पाकिस्तानी व्यक्तीला सरकारने दिल्लीत आंदोलन करू दिले असे त्यांना म्हणायचे का? या देशात तुम्ही कोणा-कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहात? हे कधीपर्यंत चालणार? तुम्ही तुमची जबाबदारी नीट पार पाडा. कामं नीट करा. आम्हाला बोलायची गरजच लागणार नाही,’’ अशा शब्दांत दिपके यांनी टीकाकारांना सुनावले.
‘जय भीम’च्या घोषणा देणे म्हणजे अराजकता आहे का?
हे आंदोलन म्हणजे अराजकता पसरवणाऱ्या मानसिकतेची अभिव्यक्ती होती, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्याचाही दिपके यांनी समाचार घेतला. ‘‘अराजकी चेहरा म्हणजे काय? आंबेडकरांचं पुस्तक घेऊन मी आंदोलनाला गेलो होतो. मी तिथे ‘जय भीम’च्या घोषणा देत होतो. जय भीमच्या घोषणा देणे म्हणजे अराजकता आहे काय? जे आंबेडकरांना फॉलो करतात, ते अराजकतवादी असतात असे फडणवीसांना म्हणायचे आहे का? त्यांचे वक्तव्य लज्जास्पद आहे. त्यांनी थोडा विचार करायला हवा. ते पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, यूपीचे नाहीत,’’ असा टोला दिपके यांनी हाणला.
युद्ध थांबवू शकतात, पेपरफुटी का नाही?
‘‘पतंप्रधान मोदी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. ही आमची मागणी आहे. शिक्षण मंत्र्यांनी चुकांची जबाबदारी घ्यायलाच हवी. पंतप्रधानांनी यात लक्ष घातलं पाहिजे. नरेंद्र मोदी रशिया आणि युव्रेनचे युद्ध थांबवू शकतात तर पेपरफुटी का थांबवू शकत नाहीत,’’ असा प्रश्नही दिपके यांनी उपस्थित केला. ‘‘मुलांना धड शिक्षण नाही. धड परीक्षा होत नाहीत. तरुणांना रोजगार मिळत नाही. या सरकारने देशाचे वाटोळे केले आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार,’’ असेही त्यांनी ठणकावले.



























































