नाकापेक्षा मोती जड, फुटबॉल वर्ल्ड कप पाहणेच अवघड; फिफा वर्ल्ड कपवर चाहत्यांचा संताप; तिकीट, व्हिसा, हॉटेल आणि विमानभाड्यांनी काढला घाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुटबॉल वर्ल्ड कप म्हणजे जगभरातील चाहत्यांसाठी चार वर्षांनी येणारा आनंदसोहळा. आपल्या देशाचा संघ मैदानात उतरताना प्रत्यक्ष स्टेडियममध्ये बसून त्याला पाठिंबा देण्याचे स्वप्न लाखो चाहते वर्षानुवर्षे उराशी बाळगून असतात. मात्र चार दिवसांनी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपबाबत अनेक फुटबॉलप्रेमींची भावना वेगळीच आहे. सामना पाहण्यापेक्षा तिथपर्यंत पोहोचणेच अधिक अवघड झाले असून, हा वर्ल्ड कप म्हणजे ‘नाकापेक्षा मोती जड’ ठरत असल्याची टीका आता उघडपणे होत आहे.

फिफा आणि आयोजकांनी या स्पर्धेला इतिहासातील सर्वात भव्य वर्ल्ड कप ठरवण्याचे स्वप्न रंगवले असले तरी चाहत्यांच्या मते हा वर्ल्ड कप ‘सर्वात महागडा’ ठरण्याच्या मार्गावर आहे. सामन्यांची तिकिटे, शहरा-शहरांमधील विमान प्रवास, महागडी हॉटेल्स, स्थानिक वाहतूक आणि खाण्यापिण्याचा खर्च यांचा हिशेब मांडला असता अनेकांच्या कपाळावर आठय़ा पडल्या आहेत.

अर्जेंटिनाच्या एका चाहत्याने संताप व्यक्त करताना म्हटले, आमच्या देशातील बहुतेक लोकांसाठी वर्ल्ड कप हा आयुष्यातून एकदाच मिळणारा अनुभव असतो. 2014 नंतर पुन्हा आमचा संघ वर्ल्ड कपमध्ये पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत. पण खर्चाचा आकडा पाहिल्यावर सामना पाहायला जातोय की चंद्रावर पर्यटनाला जातोय, असा प्रश्न पडलाय.

अमेरिकेतील अंतर्गत विमान प्रवासाचा खर्च हा चाहत्यांच्या नाराजीचा मोठा विषय ठरला आहे. न्यूयॉर्कमध्ये एक सामना आणि लॉस एंजेलिसमध्ये दुसरा सामना असेल तर त्यासाठी स्वतंत्र विमान प्रवास करावा लागणार आहे. त्यात हॉटेलच्या वाढलेल्या दरांनी चाहत्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे

सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे अमेरिकेची व्हिसा प्रक्रिया. 2018 मध्ये रशियाने वर्ल्ड कप तिकीटधारकांसाठी व्हिसा सवलती दिल्या होत्या, तर 2022 मध्ये कतारने प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ केली होती. त्याउलट अमेरिकेच्या कडक नियमांमुळे अनेक देशांतील चाहत्यांना अजूनही अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.

उरुग्वेतील ट्रव्हल एजन्सी संघटनेचे अध्यक्ष कार्लोस पेरा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अमेरिकेच्या व्हिसा नियमांमुळे यंदा उरुग्वेहून अपेक्षेपेक्षा कमी चाहते वर्ल्ड कपसाठी जाणार आहेत. जर्मनीचे फुटबॉलप्रेमी पीटर बर्गाकर यांच्याही भावना काहीशा अशाच आहेत. फुटबॉलसाठी आम्ही जगभर प्रवास केला. पण यावेळी व्हिसा, खर्च आणि प्रवेश प्रक्रियेच्या अडचणींमुळे उत्साहावरच पाणी फिरले आहे, असे ते म्हणाले.

सोशल मीडियावर तर या परिस्थितीची खिल्ली उडवली जात आहे. एका चाहत्याने लिहिले, ‘तिकीट घेतलं, हॉटेल बुक केलं, विमानाचं भाडं भरलं… आता फक्त स्टेडियममध्ये शिरण्यासाठी बँकेकडून कर्ज मंजूर व्हायचं बाकी आहे!’

फुटबॉल हा सर्वसामान्यांचा खेळ मानला जातो. मात्र 2026 चा वर्ल्ड कप पाहता तो हळूहळू श्रीमंतांच्या आवाक्यातील कार्यक्रम बनत असल्याची टीका वाढत आहे. फिफा ‘फुटबॉल सर्वांसाठी’ अशी घोषणा करत असताना प्रत्यक्षात लाखो चाहते मात्र टीव्हीसमोर बसूनच सामने पाहण्याची मानसिक तयारी करत आहेत.