
बंगळूर पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतील एका व्यक्तीला ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवत तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला रत्नागिरी पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले आहे. गगनदीप भारद्वाज (रा. नोएडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार यांचे मुंबईतील माटुंगा येथील कॅनरा बँकेत खाते आहे. आरोपींनी फिर्यादीला संपर्क साधून, “तुमच्या बँक खात्यातून ३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे,” अशी भीती घातली. तसेच आपण बंगळूर पोलीस आणि सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगून त्यांना ‘डिजिटल ॲरेस्ट’ केले. या प्रकरणातून सुटका करण्यासाठी आणि बँक खाते व्हेरीफिकेशनच्या नावाखाली आरोपीने फिर्यादीकडून तब्बल १ कोटी २३ लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे समजताच या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक बाजूने कसून तपास सुरू केला. तपासाची चक्रे फिरवत सायबर पोलिसांनी आरोपी गगनदीप भारद्वाज याला दिल्लीतून शिताफीने ताब्यात घेतले. ही कामगिरी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, तुषार जाधव, संदीप नाईक आणि सौरभ कदम यांच्या पथकाने केली.
या खळबळजनक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणीही पोलीस, सीबीआय, नॅशनल सिक्युरिटी विभाग किंवा इतर विभागातून बोलत असल्याचे सांगून, तुमचे बँक खाते किंवा सिमकार्ड गैरवापरात अडकले आहे अशी भीती दाखवत असेल तर अजिबात घाबरू नका. चौकशीच्या बहाण्याने कोणीही वैयक्तिक किंवा बँकेची आर्थिक माहिती मागत असल्यास ती देऊ नका. तसेच खाते व्हेरीफिकेशनसाठी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले तर अशा कॉलवर विश्वास ठेवू नका. अशा धमक्यांना बळी न पडता नागरिकांनी तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


























































