बसने टक्कर दिल्यानंतर अनियंत्रित इको-व्हॅन ट्रेलरला मागून धडकली; 4 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
odisha accident

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर वडोदरा जिल्ह्यातील सामियालाजवळ भीषण अपघाताची घटना घडली. बसने धडक दिल्यानंतर इको-व्हॅन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती ट्रेलरच्या मागच्या भागाला धडकली. या अपघातात इको कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, इको-व्हॅन मेहसाणाकडे जात होती. यादरम्यान भरधाव व्हॅनला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन ट्रेलरला मागून धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की व्हॅनचा चक्काचूर झाला. अपघातात इको कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. सर्व जण वडोदराच्या गोत्री आणि आमपाड गावातील रहिवासी होते. सर्व जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताचा सखोल तपास सुरू आहे. या अपघातामुळे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.