ऊसदराचे आंदोलन चिघळले; कापूरवाडीत दोन ट्रॅक्टर पेटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऊसदर जाहीर न करताच तोडणी आणि वाहतूक सुरू केल्याच्या विरोधात शेतकरी संघटनांचा संताप अनावर झाला असून, ऊस आंदोलन आता अधिकच चिघळत चालले आहे. सोमवारी मध्यरात्री मिनचे-तासगावदरम्यान कापूरवाडी (ता. हातकणंगले) रोडवर छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर अज्ञात 10 ते 15 लोकांनी पेटवून दिल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

या जाळपोळीत दोन्ही ट्रॅक्टरचे प्रचंड नुकसान झाले असून, ट्रॅक्टरचालक अक्षय बबन गांगुर्डे (रा. आष्टी, बीड) यांनी वडगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून विविध शेतकरी संघटना उत्पादन खर्चावर आधारित ऊसदराची मागणी करत साखर कारखाने, राज्य सरकार व केंद्र सरकारकडे दाद मागत आहेत. मात्र, शासन व साखर कारखानदारांनी या मागणीकडे दुर्लक्ष करत ऊसतोडणी आणि वाहतूक सुरू केली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, शेतकरी आता थेट रस्त्यावर उतरू लागले आहेत.

कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन तत्काळ दराचा तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.