महडच्या वरदविनायकाचे दर्शन तीन महिने बंद, दगड आणि चुन्याचा वापर करून मंदिराचा जीर्णोद्धार; बांधकामासाठी १२ कोटींचा निधी मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अष्टविनायकापैकी एक असलेल्या महडच्या वरदविनायकाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. मंदिराच्या बांधकामासाठी १२ कोटींचा निधी मंजूर झाला असून पारंपरिक स्थापत्य शैली जपत दगड आणि चुन्याचा वापर करून नव्या मंदिराची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी तीन महिने वरदविनायकाचे दर्शन बंद राहणार आहे.
दोन दशकांपूर्वी वरदविनायकाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करताना काँक्रीटचा वापर केला होता. मात्र आता पुरातत्व विभागाने मंदिराला पारंपरिक हेमाडपंथी शैलीतील स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी तब्बल ४१ कोटी ५३ लाखांचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला होता. मात्र सध्या केवळ १२ कोटी इतकाच निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून दगड आणि चुना यांचा वापर करून मंदिराची उभारणी केली जाणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचाल कांनी दिली. पुढील २०० ते ३०० वर्षे हे मंदिर उभे राहील, अशा पद्धतीने मंदिराचे बांधकाम करण्यात येणार आहे.

दर्शनासाठी कलश स्थापना
जीर्णोद्धाराच्या कामामुळे मंदिर प्रत्यक्ष दर्शनासाठी तीन महिने पूर्णपणे बंद राहणार आहे. या संपूर्ण मदिराच्या पुनर्विकासासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. या कालावधीत भक्तांना ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती संस्थांनचे कार्याध्यक्ष अॅड. मोहिनी वैद्य यांनी दिली. अन्नछत्र असलेल्या ठिकाणी दर्शन कलश स्थापन करण्यात आला असून याच ठिकाणी मोठी स्क्रिन बसवण्यात येणार आहे. येथे थेट गाभाऱ्यातील श्री वरदविनायक गणपतीचे दर्शन भक्तांना घेता येणार आहे.

सहा महिन्यांत काम पूर्ण करू
मंदिराच्या पुनर्विकासाबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. मंदिराच्या कामासाठी १८ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र सहा महिन्यांत मंदिराचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिराच्या बांधकामासाठी दगड आणि चुना यांचा वापर करण्यात येणार असून पारंपरिक स्थापत्य शैली जपत मंदिराची उभारणी केली जाणार आहे.