
डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरसह परिचारिकांना शिवीगाळ आणि मारहाण करणारा शिंदे गटाचा नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबईच्या सांताक्रुझ येथील फॉरेन्सिक लॅबने शास्त्रीनगर। रुग्णालयातील राड्यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे आरोपी आणि त्यांचा आवाज मारकुट्या रमेश म्हात्रे व त्याच्या साथीदारांचा असल्याचा अहवाल दिला आहे.
७ जुलै रोजी शास्त्रीनगर रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर, डॉ. वैभव साळुंखे, परिचारिका नमिता उबाळे आणि द्रव्या गिरी यांना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्याच्या गुंड कार्यकर्त्यांनी अश्लील शिवीगाळ करत अमानुष मारहाण केली होती. यानंतर पोलिसांनी रमेश म्हात्रे, रमेश पवार, प्रमोद उर्फ प्रकाश निकम, अक्षय कारंडे, साधना करांडे यांना अटक केली होती. या प्रकरणात डॉ. वैभव साळुंखे यांना मारहाण करताना तसेच डॉ. सृष्टी बाविस्कर यांना शिवीगाळ करून त्यांच्या दिशेने धाव घेतल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. या चित्रणाची आणि त्यातील आवाजाची न्यायवैद्यक तज्ज्ञांनी पडताळणी केली. संबंधित दृश्यध्वनी चित्रण योग्य असून ते घटनास्थळावरील असल्याचेही प्रयोगशाळेने प्रमाणित केल्याची माहिती आहे.
म्हात्रेसह त्याच्या साथीदारांवर गुन्हेच गुन्हे
मुख्य आरोपी रमेश म्हात्रे याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत एकूण १८ गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचा साथीदार रमेश पवार याच्याविरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. प्रकाश निकम याच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. अक्षय कारंडे याच्याविरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाण्यात तीन, तर शीळ-डायघर पोलीस ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल असल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. हे न्यायवैद्यक अहवाल आरोपपत्रासोबत जोडण्यात आले आहेत. तपास अधिकाऱ्यांनी आरोपींविरोधात एकूण २३३ कागदोपत्री पुरावे आरोपपत्रात दाखल केले आहेत.



























































