
मुंबई विमानतळावरील सोने तस्करी प्रकरणात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मोठी कारवाई करत सात जणांना अटक केली आहे. यात भाजपचा पदाधिकारी अजित आचरेकर याचाही समावेश आहे. ‘ऑपरेशन गोल्डन नेक्सस’अंतर्गत केलेल्या या कारवाईत ‘डीआरआय’ने पाच कोटी किमतीचे 3.2 किलो सोने जप्त केले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून इतरांवर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांची पुरती गोची झाली आहे.
भाजपच्या कामगार संघटनेचा चिटणीस असलेला आचरेकर हा एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेडमध्ये काम करतो. तो आणि त्याचे सहकारी रोहित सिंग आणि संतोष पोळ हे सोने तस्करांना मदत करत असल्याची माहिती ‘डीआरआय’ला मिळाली होती. त्यानंतर ‘डीआरआय’च्या पथकाने सापळा रचला. ठरल्यानुसार चौघे जण तिथे आले. त्यांच्यात बॅगांची देवाणघेवाण सुरू असतानाच ‘डीआरआय’ने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत शमीमुल्ला शाह, हमीद लेबेरीफ खान, फलिल मोहम्मद कासीम, मोहम्मद कावसार ही नावे समोर आली. त्यांनाही अटक करण्यात आली. शमीमुल्ला खानकडून तीन पॅप्सूल जप्त करण्यात आल्या. त्यात मेणाच्या स्वरूपातील सोने होते. सातही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय रॅकेट
एका हॅण्डलरच्या सूचनेनुसार आचरेकर, रोहित सिंग आणि संतोष पोळ कारवाया करत होते. बांगलादेश आणि श्रीलंकेचे दोन रहिवासी या तस्करीत सहभागी होते, असे रोहित सिंगने चौकशीत सांगितले, तर ‘डीआरआय’ने ताब्यात घेतलेले कावसार, कासीम, हमीद खान यांची चौकशी केली. हे तिघेही दुबई, बँकॉक येथून तस्करी करत असल्याचे समोर आले. त्यामुळे यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
रवींद्र चव्हाण यांनी पक्षात घेतले कामगार संघटनेचे चिटणीस पद दिले
तस्करीत अटक करण्यात आलेल्या अजित आचरेकरला काही महिन्यांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षात प्रवेश दिला होता. त्याच्याकडे अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या चिटणीस पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. सत्तेचा आशीर्वाद लाभल्याने आचरेकर आणि त्याच्या साथीदारांची दादागिरीही वाढली होती. प्रतिस्पर्धी कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडून जाहीर धमक्या दिल्या जात होत्या. सोशल मीडियात याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
हे प्रकरण गंभीर, खोलात जाऊन चौकशी करा!
हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलले पाहिजे. ते यावर का बोलत नाहीत, असा सवाल शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर बोलताना केला. ‘महाराष्ट्र या लोकांनी नासवला आहे. अशा प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. तशी ती झाली तर भाजप पैसा कुठून कमावतो हे उघड होईल,’ असे ते म्हणाले.

























































