
बनावट बोर्डिंग पासद्वारे युनायटेड एअरलाईन्सच्या विमानात घुसखोरी करणाऱ्या एका प्रवाशाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. अब्दुलरहमान ओलुवाटुमिके ओरियोमी (25) असे अटक केलेल्या प्रवाशाचे नाव आहे. अमेरिकेतील जॉर्ज बुश इंटरकॉन्टिनेंटल विमानतळावर ही घटना घडली. या घटनेमुळे विमानतळावरील तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर जात असतानाच हा प्रकार उघडकीस आला. यामुळे विमानाला परत गेटवर परतावे लागले.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ओरियोमी हा जॉर्ज बुश विमानतळावर दाखल झाला. विमानतळावरील सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्याने टीएसए तपासणी नाका पार केला आणि लॉस एंजेलिसला जाणाऱ्या विमानात बसण्याचा प्रयत्न केला. सकाळी 7.10 च्या सुमारास एका गेटवर बोर्डिंग पास स्कॅन करण्याचा त्याने अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर तो दुसऱ्या गेटकडे गेला. विमानतळावर जवळपास तासभर वाट पाहिल्यानंतर तो युनायटेड एअरलाईन्सच्या लॉस एंजेलिसला जाणाऱ्या विमानात घुसला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओरियोमीने विमानाचे बुकिंग केले होते, मात्र पैसे भरल्यामुळे त्याचे तिकीट एअरलाइन्सकडून रद्द करण्यात आले होते. तिकीट रद्द झालेले असतानाही ओरियोमीने मोबाईलमध्ये बनावट बोर्डिंग पास तयार केला. बनावट बोर्डिंग पासच्या आधारे त्याने आत प्रवेश मिळवला.
युनायटेड एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित झाल्याची संधी साधत तो जेटवेमधून थेट ‘युनायटेड फ्लाईट 469’ घुसला. तो सुरुवातीला एका जागेवर जाऊन बसला, परंतु ती जागा दुसऱ्या प्रवाशाची असल्याचे समोर आल्यावर त्या जागेवरून उठला. संपूर्ण विमानात एकही सीट रिकामी नसल्याने ओरियोमी थेट विमानातील स्वच्छतागृहात जाऊन लपला. विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर जात असताना कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता तो वॉशरुममध्ये आढळून आला आणि त्याचे बिंग फुटले. त्यानंतर विमान परत गेटवर आणण्यात आले.
विविध कायदा अंमलबजावणी व सुरक्षा संस्थांनी आरोपीवर कारवाई सुरू केली. सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवून विमानाची तपासणी करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे तीन विमानाचा खोळंबा झाला. तपासकर्त्यांनी ओरियोमीच्या मोबाईलमधील बोर्डिंग पासच्या प्रतिमेची तपासणी केली असता तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले. ही घटना 1 जून रोजी घडली होती. घटनेच्या दिवशी ओरीयोमीची चौकशी करून त्याला अनधिकृत प्रवेशाबाबत ताकीद देण्यात आली. 1 जूनपर्यंत त्याच्यावर कोणताही औपचारिक आरोप ठेवण्यात आला नव्हता. पुढील तपासानंतर त्याला शुक्रवारी, 5 जून रोजी अटक करण्यात आली. पुढील कारवाई सुरू आहे.






















































