अमेरिकेतील तेल राखीवसाठ्यात मोठी घट; कच्च्या तेलाच्या किमती 160 डॉलरपर्यंत वाढण्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कच्च्या तेलाबाबत एक धोकादायक इशारा देण्यात आला आहे. काही प्रमुख तेल कंपन्यांनी याबाबतचा इशारा दिला आहे. अमेरिकेतील राखीव तेलसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 160 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा धोका आहे.

एका जागतिक तेल कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्षांच्या मते, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 160 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. अमेरिकेतील कच्च्या तेलाचा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा साठा २२ वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे जगातील काही मोठ्या तेल कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती आधीच उच्च पातळीवर आहेत. यामुळे देशातील तेल विपणन कंपन्यांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढवण्यास भाग पडले आहे.

एक्सॉनमोबिलचे वरिष्ठ उपाध्यक्ष नील चॅपमन यांनी म्हटले आहे की, जागतिक साठा खूप कमी होत आहे. येत्या काही दिवसांत पुरवठा वाढला नाही, तर ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल १५० ते १६० डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. पुरवठ्याच्या कमतरतेच्या काळात बाजारपेठ अनिश्चित काळासाठी राखीव साठ्यावर अवलंबून राहू शकत नाही. इतर अनेक अधिकाऱ्यांचाही असा विश्वास आहे की आपत्कालीन साठा आणि व्यावसायिक साठ्याने त्यांना अचानक येणाऱ्या धक्क्यांपासून वाचवले आहे, परंतु आता राखीव साठा वेगाने कमी होत आहे.

सततच्या तणावामुळे तेलाच्या किमती वाढू शकतात. विश्लेषकांच्या मते, हा धोका केवळ कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापुरता मर्यादित नाही. पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ (ATF) सारख्या शुद्ध केलेल्या उत्पादनांनाही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. काही परिस्थितींमध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन वेगाने वाढवता येते, परंतु शुद्ध इंधनाचा साठा तेल शुद्धीकरण कारखान्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो.

कच्च्या तेलाच्या किमती उच्च पातळीवर आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे ७० डॉलर होत्या, पण आता त्यांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. एका क्षणी, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १२० डॉलरपर्यंत पोहोचल्या होत्या. तथापि, नंतर तेलाच्या किमती १०० डॉलरच्या वर राहिल्या. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे ९५ डॉलरच्या आसपास आहेत.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वारंवार वाढवल्या आहेत. एटीएफच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. गॅसच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत.आता अनेक देशांसह अमेरिकेचाही राखीव तेलाचा साठ घटत असल्याने तेलाच्या किंमतीबाबत जगाची चिंता वाढली आहे.