ती आली… एक दिवस फिरली आणि धुळीत जाऊन बसली; एकनाथ शिंदेंनी लोकार्पण केलेल्या पहिल्याच डबल डेकर बसचे पालिकेने काढले धिंडवडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ती आली… एक दिवस फिरली आणि धुळीत जाऊन बसली, अशी अवस्था सध्या ठाणेकरांच्या स्वप्नातील डबल डेकर बसची झाली आहे. स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उपलब्ध नसल्याने ही डबल डेकर गेले ३६ दिवस आगारातच उभी आहे. महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करून लोकार्पण केलेल्या पहिल्याच डबल डेकर बसचे पालिकेने अक्षरशः धिंडवडे काढले आहेत.

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात इलेक्ट्रिक वातानुकूलीत डबल डेकर बसेसची मागणी करण्यात येत होती. डबल डेकरमधून फिरण्याचे स्वप्न ठाणेकरांनी पाहिले होते. ठाण्याच्या रस्त्यावर बसची चाचणीदेखील यशस्वीरीत्या पार पडली. मात्र पहिली वातानुकूलित डबल डेकर बस अद्याप प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकलेली नाही. आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता न केल्याने पालिका प्रशासनावर नामुष्की ओढवली आहे. सध्या ही बस घोडबंदरच्या आनंदनगर आगारात धूळखात उभी असताना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी वागळे टीएमटी आगाराला भेट देत चार्जिंग स्टेशन उभारणीच्या कामांचा आढावा घेतला.