
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी परिसरात अपघातांची मालिका सुरू असून चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या मध्यभागी टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे पुन्हा एकदा छोट्या पिकअप वाहनाचा शुक्रवारी रात्री अपघात झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या संगमेश्वर तालुक्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक, परावर्तक चिन्हे आणि इशारा फलक नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात मार्गाचा अंदाज घेणे कठीण जात आहे. परिणामी धामणी येथे सलग दुसऱ्या दिवशी अपघात घडल्याची घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून महामार्गाचे काम अत्यंत बेफिकिरीने सुरू असल्याचा आरोप केला आहे. वारंवार अपघात होऊनही संबंधित यंत्रणा आणि ठेकेदार कंपनीकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
संगमेश्वर-धामणी गावचे माजी पोलीस पाटील अनंत पुरुषोत्तम पाध्ये यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सततच्या अपघातांना जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले असून तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवून अपघात रोखावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.































































