
दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ अधिकाधिक वाढत आहे. विषारी कलिंगडाच्या सेवनाने चौघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय होता. आता तर डोकाडियांच्या घरातून जप्त केलेल्या सुरी, प्लेट, भात, चिकन-बिर्याणी तसेच हर्बल उंदीर नाशकात विषारी झिंक फॉस्फाईडचा अंश नसल्याचे नव्या फॉरेन्सिक चाचणी अहवालात समोर आले आहे.
पहिल्या फॉरेन्सिक अहवालात कलिंगडामध्ये तसेच त्यांच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांमध्ये (व्हिसेरा) ‘झिंक फॉस्फाइड’ आढळून आले होते.
सवा महिन्यापूर्वी चौघांचा मृत्यू
26 एप्रिल रोजी अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन आणि दोन मुली आयेशा आणि झैनब यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांनी आदल्या रात्री चिकन-बिर्याणी खाल्ली होती, तर मध्यरात्रीनंतर चौघांनीच कलिंगड खाल्ले होते.
पायधुनी येथील निवासस्थानावरून जप्त करण्यात आलेला स्वयंपाकघरातील चाकू, स्वयंपाकाचे तीन मोठे चमचे, चार ताटं, कच्चे तांदूळ, चिकन-बिर्याणी आणि उंदीर पळवून लावणाऱ्या स्प्रेची बाटली पोलिसांनी तपासणीसाठी पाठवली होती. या आठवडय़ात पोलिसांना तपासणीचा अहवाल प्राप्त झाला.


























































