
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि सोशल मीडियावरील चर्चित व्यक्तिमत्त्व अभिजीत दीपके शनिवार (6 जून) हिंदुस्थानात दाखल झाले आहेत. अमेरिकेतून प्रवास करून ते सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचले. त्यांच्या आगमनामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून सोशल मीडियावरही त्यांच्या हिंदुस्थानातील दौऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दिल्लीतील नियोजित कार्यक्रम आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर दीपके यांच्या आगमनाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. हिंदुस्थानामध्ये येण्यापूर्वी येण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थकांना विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. सुरक्षा व्यवस्था आणि इतर प्रवाशांना होणारा त्रास टाळण्यासाठी हे आवाहन करण्यात आले होते.
‘मी हिंदुस्थानसाठी निघालो आहे. मी माझे भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो, जय भीम! असे म्हणत ते अमेरिकेतून रवाना झाले होते. नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे होणाऱ्या निदर्शनांमध्ये ते सहभागी होणार आहेत. मात्र समर्थकांनी दिल्ली विमानतळावर येऊ नये, असे आवाहन त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकून केले होते तरीही विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीन जंतरमंतर येथे निदर्शने आयोजित केली आहेत. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी काही दिवसांपूर्वी बेरोजगार तरुणांसंबंधी केलेल्या कॉकरोच टिप्पणीनंतर अभिजीत दीपके यांनी कॉकरोच जनता पार्टी स्थापन केल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती.
अभिजीत दीपके यांनी यापूर्वी देशातील विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या हिंदुस्थान दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दिल्लीत होणाऱ्या आगामी कार्यक्रमांमध्ये ते विविध विषयांवर भाष्य करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, त्यांच्या आगमनानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समर्थकांकडून स्वागताचे संदेश दिले जात असून पुढील कार्यक्रमांविषयी उत्सुकता वाढली आहे. दिल्लीतील त्यांच्या हालचाली आणि आगामी घोषणांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





























































