उल्हासनगर शासकीय रुग्णालयात नवजात बालिकेचा मृत्यू , आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. विशेष नवजात अतिदक्षता विभाग आणि बालकांसाठी आवश्यक व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध नसल्याने चिमुकलीला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. आरोग्य सुविधांच्या या कमतरतेमुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
नाजीरा राजभर या गर्भवती मातेने उल्हासनगरमधील खासगी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी कन्येला जन्म दिला होता. कमी वजनामुळे बालिकेची प्रकृती चिंताजनक असल्याने बाळाला तातडीने एनआयसीयू आणि विशेष व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. यासाठी तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच बालिकेचा मृत्यू झाला. बालिका दगावल्याची समजताच कुटुंबीय आणि नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप केले. वेळेत योग्य उपचार व आवश्यक यंत्रणा उपलब्ध न झाल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. दरम्यान, भाजप नगरसेविका सुचित्रा सिंह यांनी या प्रकरणाची मुख्यमंत्री आणि आरोग्य विभागाकडे रुग्णालय प्रशासनाची तक्रार केली आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.