हिंदुस्थानकडून पाकिस्तानचा फडशा, पिछाडीवरून अखेरच्या 12 मिनिटांत बदलला गेम; 18 वर्षांखालील आशिया चषकाच्या फायनलमध्ये दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानचा फडशा पाडत हिंदुस्थानने 18 वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. आशिया चषकाच्या या सेमी फायनलकडे तमाम क्रीडा विश्वाचे डोळे लागले होते. या सामन्यात पाकिस्तानचा संघ 48 व्या मिनिटांपर्यंत आघाडीवर होता. पण त्यानंतर हिंदुस्थानने सामन्यात झोकात पुनरागन केले. त्यामुळे हिंदुस्थानने पाकिस्तानवर 5-3 असा दमदार विजय साकारत फायनलमध्ये दमदार एंट्री केली.

हिंदुस्थानचा संघ 18 वर्षांखालील आशिया कपच्या हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही तिसरी वेळ आहे. हिंदुस्थानच्या संघाने 2001 मध्ये प्रथम ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर हिंदुस्थानचा संघ 2016 मध्येही विजयी ठरला होता.

आतापर्यंत जेव्हा जेव्हा हिंदुस्थानचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे तेव्हा त्यांनी जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे यावेळीही हिंदुस्थानवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील.

उपांत्य फेरीच्या सामन्याच्या 12 व्या मिनिटाला पूर्ती आशीष तानीने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. त्यानंतर 27 व्या मिनिटाला आदिलच्या मैदानी गोलने पाकिस्तानने सामना बरोबरीत आणला. पण त्यानंतर हिंदुस्थानने कमबॅक केले. 35 व्या मिनिटाला शाहरुख अलीने हिंदुस्थानसाठी गोल केला. पण पाकिस्तानही हिंदुस्थानला सडेतोड उत्तर देत होता. हिंदुस्थानच्या यशानंतर अवघ्या दोन मिनिटांनंतर मुहम्मद फरहान अस्लमने पाकिस्तानसाठी गोल करून 2-2 अशी बरोबरी साधली.

हा सामना 2-2 असा बरोबरी होता आणि आता आघाडी कोण घेणार, यावर सर्वांची नजर खिळलेली होती. 42 व्या मिनिटाला उझैर अहमद कुरेशीने केलेल्या गोलमुळे पाकिस्तानला सामन्यात प्रथमच आघाडी मिळाली. त्याने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यानंतर 48 मिनिटांपर्यंत पाकिस्तान आघाडीवरच होता. पण 49 व्या, 53 व्या आणि 56 व्या मिनिटाला पूर्ती आशीष तानीने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून हिंदुस्थानचा विजय निश्चित केला.