
नीट पेपरफुटी आणि मतचोरीविरोधात ‘जेन-झी’ आंदोलकांनी सरकारला चांगलाच घाम पह्डल्यानंतर आता पोलिसांच्या माध्यमातून ‘जेन-झी’ आंदोलकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून ‘चांगल्या वर्तनाचे बंधपत्र’ लिहून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सरकारची मनमानी आणि पोलिसांची दडपशाही झुगारून ‘जे-झी’ रस्त्यावर उतरत आहेत. मात्र आता दिल्ली पोलिसांप्रमाणे मुंबई पोलिसांनीही कारवाई सुरू केली आहे. रविवारी सायंकाळी ‘आयआयटी’ मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याला न्याय मिळावा यासाठी मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता. या सर्व आंदोलनात आघाडीवर असलेल्या साम्या कोरडे यांना मुंबई पोलिसांनी टार्गेट केले आहे. त्यांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस बजावताना साम्या यांना नीटप्रकरणासाह विविध आंदोलनांचा दाखला देण्यात आला आहे.
हटणार नाही, घाबरणार नाही
लोकशाही मार्गाने होत असलेली आंदोलने दडपण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे नवे हत्यार उपसले आहे, पण त्याला आम्ही घाबरणार नाही. आंदोलन करणे हा राज्यघटनेने दिलेला अधिकार असून त्याबाबतीत कुठलीही तडजोड होणार नाही. या नोटिशीला कायदेशीर उत्तर देऊ आणि न्यायासाठी लढा सुरूच ठेवू असे कोरडे यांनी सांगितले.
सात दिवसांत उत्तर देण्यास बजावले
आपल्याविरोधात खटला का चालवू नये व आपल्याकडून भविष्यात चांगल्या वर्तुणकीकरिता बंधपत्र का घेऊ नये, चांगल्या वर्तुणकीकरिता एक वर्षाकरिता 50 हजार रुपयांचे एका प्रतिष्ठत लायक जामीनदारासह बंधपत्र का घेऊ नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत त्याला उत्तर देणे बंधनकारक करण्यात आले आहे.






























































