बारामतीत तीन तासांत 200 मिमी. पाऊस, इंदापूरसह जिल्ह्यातील सर्वदूर पावसाने दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाअभावी पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱया बारामती आणि इंदापूर तालुक्यांना सोमवारी पहाटे अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अवघ्या दोन ते तीन तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरांसह ग्रामीण भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले. बारामतीत 158 ते 170 मिमी, तर काही ठिकाणी 200 मिलिमीटर पर्यंत पाऊस झाला.

इंदापूर तालुक्यात 131 मिमी पावसाची नोंद झाली. अचानक कोसळलेल्या पावसाने एकीकडे शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण केली असतानाच, दुसरीकडे पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या भागांना काहीसा दिलासाही मिळाला आहे. बारामती इंदापूरसह जिह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, दौंड, पुरंदरसह काही तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याना दिलासा मिळाला आहे. जिह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत घट झाली होती. अशा परिस्थितीत झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले वाहू लागले असून, काही ठिकाणी विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, कमी वेळेत मोठया प्रमाणावर पाऊस झाल्याने पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाण्याचे प्रमाणही अधिक राहण्याची शक्यता आहे.

बारामती शहरातील मुख्य रस्ते, एसटी बसस्थानक परिसर आणि सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर केली. इंदापूर तालुक्यातही अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातही चांगला पाऊस झाला. काल रात्री आणि आज सकाळी झालेल्या पावसाने रब्बी पिकांना जीवदान मिळाले. काही ठिकाणी ओढय़ा नाळ्यांना पाणी आल्याने पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. दौंड, पुरंदरमधील दुष्काळी भागात पाऊस झाला.