शिकारीला निघालेल्या बिबटय़ाची सापानेच केली शिकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिबटय़ाला शिकारीचा राजा मानले जातो. मात्र त्याच महाबलवान बिबटय़ाची सापाने शिकार केली आहे. रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर तालुक्यात गोळवली ते तुरळ दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी मध्यरात्री मृतावस्थेत आढळलेल्या मादी बिबटय़ाच्या मृत्यूचे गूढ अखेर शवविच्छेदन अहवालातून उलगडले. वाहनाच्या धडकेने नव्हे तर सर्पदंशामुळे या बिबटय़ाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिबटय़ा मृतावस्थेत पडल्याची माहिती या मार्गावरून जाणाऱया एका प्रवाशाने वन विभागाला दिली. वन कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेत मृत बिबटय़ाला ताब्यात घेतले आणि साडवली येथे आणले. सुरुवातीला हा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. मात्र, जेव्हा साखरपा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबटय़ाचे शवविच्छेदन केले, तेव्हा सत्य समोर आले. बिबटय़ाचे सर्व अवयव सुस्थितीत होते. अंगावर कोणत्याही शिकारीच्या किंवा मानवी हल्ल्याच्या खुणा नव्हत्या. मृत्यूचे नेमके कारण ‘सर्पदंश’ असल्याचे अहवालात निष्पन्न  झाले.