कॅप्टन डायना ट्रॉफीचे वानखेडेवर उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वानखेडे स्टेडियमवर सोमवारी ‘कॅप्टन डायना ट्रॉफी’चे (23 वर्षांखालील महिला निवड चाचणी स्पर्धा) उद्घाटन झाले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे आणि यामधून बीसीसीआयच्या 23 वर्षांखालील महिला टी-20 स्पर्धेसाठी संघ निवडण्यात येणार आहे. हिंदुस्थानच्या माजी कर्णधार डायना एडुलजी यांच्या सन्मानार्थ आयोजित या स्पर्धेत मुंबईतील अनेक उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू सहभागी झाल्या आहेत.

कॅप्टन डायना ट्रॉफी हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्यामुळे होतकरू क्रिकेटपटूंना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे. डायना एडुलजी यांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो. हिंदुस्थानी क्रिकेटमधील त्यांचे योगदान आजही अनेक पिढय़ांना प्रेरणा देत असल्याचे  एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले.

उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूंसाठी ‘कॅप्टन डायना ट्रॉफी’सारखे उपक्रम आयोजित केले जात आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुंबई हे नेहमीच हिंदुस्थानी क्रिकेटचे केंद्रस्थान राहिले आहे. या स्पर्धांमुळे तरुण खेळाडूंना आवश्यक तो अनुभव आणि स्पर्धात्मक वातावरण मिळते, ज्यामुळे त्यांना पुढील स्तरावर जाण्यास मदत होत असल्याचे डायना एडुलजी म्हणाल्या.