
आजच्या काळात रेफ्रिजरेटर हा प्रत्येक घरातील अत्यावश्यक उपकरण बनला आहे. मात्र, अनेकजण जागेची बचत करण्याच्या उद्देशाने फ्रिज थेट भिंतीला लागून किंवा घराच्या कोपऱ्यात ठेवतात. ही सवय किरकोळ वाटली तरी त्यामुळे फ्रिजच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि काही प्रसंगी अपघातांचाही धोका निर्माण होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, रेफ्रिजरेटरच्या मागील बाजूस किमान 5 ते 10 सेंटीमीटर (सुमारे 2 ते 4 इंच) मोकळी जागा असणे आवश्यक आहे. तसेच फ्रिजच्या दोन्ही बाजूंनाही साधारण 5 सेंटीमीटर अंतर ठेवणे फायदेशीर ठरते. फ्रिजच्या वरच्या भागातही पुरेशी जागा असल्यास उष्णता सहज बाहेर पडते आणि उपकरण सुरळीत चालते.
फ्रिजच्या मागील बाजूस कंप्रेसर आणि कंडेन्सर कॉइल्स असतात. या भागातून निर्माण होणारी उष्णता बाहेर जाणे गरजेचे असते. जर फ्रिज भिंतीला खूप जवळ ठेवला, तर गरम हवा अडकते आणि कंप्रेसरवर अतिरिक्त ताण येतो.
उन्हाळ्यात अधिक काळजी का आवश्यक?
उन्हाळ्यात बाहेरील तापमान आधीच जास्त असते. अशा वेळी फ्रिजला आतील तापमान कायम थंड ठेवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. जर हवेचा पुरेसा प्रवाह नसेल, तर उपकरण अधिक गरम होऊ शकते. दीर्घकाळ असे झाल्यास विद्युत घटकांवर परिणाम होऊन फ्रिजची कार्यक्षमता घटू शकते.
फ्रिज ठेवण्यासाठी योग्य जागा कोणती?
फ्रिज नेहमी थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावा. तसेच गॅस स्टोव्ह, ओव्हन किंवा इतर उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांपासून शक्य तितके अंतर ठेवणे आवश्यक आहे. हवेचा चांगला संचार होईल अशा जागी आणि भिंतीपासून योग्य अंतर ठेवून फ्रिज बसवल्यास तो अधिक कार्यक्षमतेने काम करतो आणि विजेची बचतही होते.
फ्रिजची योग्य जागा निवडणे ही केवळ सोयीची बाब नसून सुरक्षिततेशीही संबंधित आहे. भिंतीपासून पुरेसे अंतर ठेवून आणि योग्य वायुवीजनाची व्यवस्था करून तुम्ही फ्रिजचे आयुष्य वाढवू शकता, वीज वाचवू शकता आणि संभाव्य अपघातांचा धोका कमी करू शकता.




























































