तेल शुद्धीकरण कारखाने बंद, तेल उत्पादनात घट; रशियाला मोठा आर्थिक फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी पुढाकार घेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना खुले पत्र पाठवले आहे. मात्र, आतापर्यंत या युद्धामुळे रशियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यांत, युक्रेनने रशियाच्या तेल प्रतिष्ठापना आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे रशियाच्या तेल उत्पादनावर परिणाम झाला आहे.

रशियाने आतापर्यंत हे कधीही मान्य केले नाही. मात्र, गुरुवारी रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक म्हणाले की, वर्षाच्या सुरुवातीपासून रशियाच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट झाली आहे. देशातील अनेक तेल शुद्धीकरण कारखाने दुरुस्ती आणि देखभालीच्या कामात अडकले आहेत. त्यामुळे रशियाच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट झाली आहे. देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी रशियाने जेट इंधन आणि गॅसोलीनच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत.

सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचादरम्यान पत्रकारांशी बोलताना नोवाक म्हणाले, सध्या, रशियाचे तेल उत्पादन २०२६ च्या सुरुवातीच्या तुलनेत कमी आहे. आमच्या अनेक तेल शुद्धीकरण कारखान्यांमध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. आम्ही आमच्या निर्यात पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त वापर करत आहोत. नोवाक यांचे विधान हे दर्शवते की युक्रेनमधील वाढत्या ड्रोन हल्ल्यांचा परिणाम रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांच्या देशांतर्गत शुद्धीकरण क्षमतेवर होत आहे.

या पार्श्वभूमीवर, रशियाने कच्च्या तेलाची निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, युक्रेनने बाल्टिक समुद्र आणि काळ्या समुद्रातील रशियन निर्यात टर्मिनलना लक्ष्य केले आहे. या आठवड्यात, रशियाने ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत जेट इंधन निर्यातीवर बंदी घातली आहे. रिफायनिंग पायाभूत सुविधांवर युक्रेनकडून होणाऱ्या वाढत्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणे हा यामागील उद्देश आहे. या बंदीचा आंतरराष्ट्रीय जेट इंधन बाजारावर मोठा परिणाम होण्याची अपेक्षा नाही, कारण रशिया केवळ अल्प प्रमाणात विमान इंधनाची निर्यात करतो. मात्र, या युद्धामुळे रशियाला मोठा आर्थिक फका बसला आहे.