सहा संघटनांनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र, पारशी समुदायाचा नोएल टाटा यांना पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टाटा समूहाची कंपनी टाटा सन्सचा आयपीओ आणि अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला नोएल टाटा यांनी विरोध दर्शवल्याने टाटा समूहामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. नोएल टाटा आणि संचालक मंडळामध्ये सुरू असलेल्या वादात आता सहा पारशी संघटनांनी नोएल टाटा यांना पाठिंबा दिला आहे. तसेच यासंबंधी या संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी टाटा ट्रस्टला आणि टाटा कुटुंबाला आपला जाहीर पाठिंबा आहे, असे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या या पत्रात या सहा संघटनांनी टाटा ट्रस्टची बाजू घेतली असून हा वाद केवळ भागधारकांमधील मतभेदांपुरता मर्यादित नसून त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त केली आहे. टाटा सन्सला शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याबाबतच्या चर्चेकडे केवळ एक नियामक किंवा तांत्रिक बाब म्हणून पाहू नये. बाजारातील दबावामुळे टाटा सन्सची मूळ मूल्ये, त्याचे स्वरूप आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर परिणाम होऊ शकतो. टाटा सन्सची व्यवस्थापनाची पारंपरिक कार्यपद्धती जपण्याचे महत्त्व सरकारने ओळखावे, असेही या संघटनांचे म्हणणे आहे.

 टाटा समूहाची जगभरात प्रतिष्ठा

जागतिक स्तरावर टाटा समूहाला अत्यंत आदराची वागणूक मिळते. समूहाच्या या अद्वितीय, परोपकारी स्वरूपाला धक्का लागल्यास त्याचे वाईट परिणाम होतील. जमशेदजी टाटा, जे.आर.डी. टाटा, डॉ. होमी भाभा, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि नानी पालखीवाला यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींनी भारताचा औद्योगिक, वैज्ञानिक, लष्करी आणि कायदेशीर पाया घडवण्यास मदत केली, असेही या पत्रात म्हटले आहे.