शेअर बाजार कोसळला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठवडय़ाच्या अखेरच्या दिवशी हिंदुस्थानी शेअर बाजार कोसळला. शुक्रवारी सेन्सेक्स 125 अंकांनी घसरून 73,123 अंकांवर, तर निफ्टी 87.65 अंकांनी घसरून 22,600 अंकांवर बंद झाला. आज दिवसभरात झालेल्या व्यवहारात 797 शेअर्समध्ये वाढ तर 3275 शेअर्समध्ये घसरण झाली. 114 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. मिडकॅप शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजार कोसळला.

मिडकॅप इंडेक्स दोन टक्क्यांहून अधिक घसरला. निफ्टी बँक इंडेक्स 638 अंक घसरून 54,287 अंकांवर बंद झाला. स्विगीच्या शेअर्समध्ये 17 टक्के घसरण झाली. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वात जास्त घसरण आहे. सेन्सेक्स आज दिवसभरात सर्वोच्च स्तरावरून 1200 अंक खाली कोसळला होता. यामुळे सेन्सेक्स 72,600 अंकाच्या जवळ पोहोचला होता, तर निफ्टीत 260 अंकांहून अधिक घसरण होऊन 22,450 अंकांपर्यंत खाली कोसळला होता. त्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये गुंतवणूकदारांचे दहा लाख कोटी रुपये स्वाहा झाले होते. परंतु दिवसअखेर बाजार सावरल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. कच्चे तेल महाग झाल्याने याचा थेट परिणाम हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर झाला. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील शेअर्स विक्रीला काढले. गुरुवारी विदेशी गुंतवणूकदारांनी 3459 कोटींच्या शेअर्सची विक्री केली.