
रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी एका खुल्या पत्राद्वारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत प्रत्यक्ष भेटीचा प्रस्ताव ठेवला आहे. झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, युद्ध संपवण्यासाठी आता थेट प्रमुख नेत्यांमध्ये प्रत्यक्ष संवाद आवश्यक आहे आणि केवळ याच मार्गाने स्थायी शांतता प्रस्थापित होऊ शकते. झेलस्की यांच्या पत्रानंतर पुतिन आणि झेलेन्स्की एकाच टेबलावर समोरासमोर बसतील का? अशी चर्चा होत आहे.
सुमारे १,८०० शब्दांच्या पत्रात झेलेन्स्की यांनी लिहिले आहे की, जोपर्यंत दोन्ही देशांचे सर्वोच्च नेते थेट संवाद साधत नाहीत, तोपर्यंत हे युद्ध थांबवता येणार नाही. अमेरिका सध्या इराण संकटावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे, त्यामुळे हे युद्ध थांबवण्यासाठी प्रत्यक्ष संवाद गरजेचा आहे.
झेलेन्स्की यांनी पुतिन यांना उद्देशून म्हटले, युक्रेन थेट संवादातून हे युद्ध संपवण्याचा प्रस्ताव देत आहे. त्यासाठी मी एका बैठकीचा प्रस्ताव देतो. ही बैठक तुर्की किंवा स्वित्झर्लंडसारख्या तटस्थ देशात होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. या पत्रात झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यावर टीकाही केली. त्यांनी लिहिले की, २६ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर आता वयाचा परिणाम दिसू लागला आहे. अलीकडील युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांचा संदर्भ देत, त्यांनी रशियावर दबाव कायम ठेवण्याचे संकेतही दिले.
रशियाने हे पत्र मिळाल्याची पुष्टी केली असली तरी, रशियाने सावध प्रतिक्रिया दिली आहे. रशियाने म्हटले की, झेलेन्स्की यांची इच्छा असल्यास ते रशियात येऊन पुतिन यांना भेटू शकतात. सेंट पीटर्सबर्गमधील एका कार्यक्रमात बोलताना पुतिन म्हणाले की, ते तडजोडीसाठी तयार आहेत, परंतु दोन्ही बाजूंना समोरासमोर यावे लागेल, असे ते म्हणाले.
रशिया अजूनही आपल्या जुन्या मागण्यांवर ठाम आहे. युक्रेनने डोनेत्स्क, लुहान्स्क, खेरसॉन आणि झापोरिझिया या प्रदेशांवरील आपले दावे सोडून द्यावेत आणि नाटोमध्ये सामील होण्याचे प्रयत्न थांबवावेत, अशी पुतिन यांची इच्छा आहे. तर युक्रेनने या अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांनी हा प्रदेश सोडला, तर रशिया भविष्यात पुन्हा हल्ला करू शकतो, त्यामुळे त्यांना या अटी मान्य नाहीत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दोन्ही नेत्यांच्या संभाव्य भेटीचे स्वागत केले आहे. ट्रम्प म्हणाले की, पुतिन आणि झेलेन्स्की समोरासमोर बोलल्यास उत्तम होईल आणि त्यामुळे शांतता प्रक्रियेला पुढे नेण्यास मदत होऊ शकते. आतापर्यंत झालेल्या शांतता चर्चा अयशस्वी ठरल्या असल्या तरी, आणि दोन्ही बाजू आपापल्या अटींवर ठाम असल्या तरी, झेलेन्स्कींच्या खुल्या पत्राकडे युद्ध संपवण्याच्या दिशेने एक नवीन राजनैतिक पुढाकार म्हणून पाहिले जात आहे, परंतु हा पुढाकार खरोखरच पुतिन आणि झेलेन्स्की यांना एकाच चर्चेच्या टेबलावर आणेल की नाही, याबाबत चर्चा होत आहे.

























































